
महाराष्ट्राची वरदायिनी ठरणाऱया कोयना धरणक्षेत्रात पुन्हा पाऊस सुरू झाला आहे. या पावसामुळे धरणांतर्गत विभागातील छोटय़ा नद्या, नाले, ओढे, धबधबे यांतून पुन्हा पाण्याची आवक सुरू झाली आहे. 105.25 टीएमसी पाणी साठवणक्षमता असलेल्या या धरणात आता 100.06 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरणात यापुढे केवळ 5.19 टीएमसी पाणी सामावून घेण्याची क्षमता शिल्लक राहिलेली आहे.
1 जूनपासून आत्तापर्यंत कोयना धरणात एकूण 120 टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. एक जूनपासून आत्तापर्यंत धरणातून पश्चिम वीज निर्मितीसाठी 14.02 टीएमसी, पूर्वेकडे सिंचनासाठी 4.27 टीएमसी, पूरकाळात 4.98 टीएमसी, विनावापर दरवाजातून सोडलेले 15.67 टीएमसी, आपत्कालीन दरवाजातून 0.71 टीएमसी अशा एकूण 39.65 टीएमसी पाण्यानंतरही सध्या धरणात तब्बल 100.06 टीएमसी उपलब्ध पाणीसाठा झाला आहे.
एक जूनपासून आत्तापर्यंत कोयना येथे 3969 मिलिमीटर, नवजा 4856 मि.मी. व महाबळेश्वर येथे 5182 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.




























































