
दुबईत खेळवल्या जाणाऱ्या यंदाच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आयपीएलमध्ये बहाद्दुरी गाजवणारे हिंदुस्थानी शेर पार ढेर झाले. सुपर-4 फेरीत आधी पाकिस्तानने हरवले आणि नंतर नवख्या खेळाडूंचा भरणा असलेल्या श्रीलंकन क्रिकेट संघाने टी-20तील माजी विश्वविजेत्या टीम इंडियाला 6 विकेटनी पराभूत केले. कागदावर शेर वाटणारा हिंदुस्थानी क्रिकेट संघ स्पर्धेतून बाहेर पडण्याची नामुष्की ओढवल्यावर मात्र टीम इंडियावर आणि क्रिकेटवर जिवापाड प्रेम करणारे हिंदुस्थानी क्रिकेट शौकिनांचा संताप अनावर झाला आहे. संतप्त चाहत्यांनी सोशल साईट्सवर ‘बॉयकॉट आयपीएल’ मोहीम सुरू केली आहे. क्रिकेटशौकीन बलाढय़ हिंदुस्थानी संघाच्या फ्लॉप शोबद्दल आयपीएलला जबाबदार मानत आहेत. आयपीएलमध्ये कोटय़वधी रुपयांसाठी खेळणाऱया हिंदुस्थानी गोलंदाजांच्या फ्लॉप शोवर चाहते आगपाखड करीत आहेत. काही नेटकऱयांनी तर रोहितला बाजूला करा आणि कर्णधार म्हणून जिगरबाज महेंद्रसिंह धोनीला पुन्हा संघाचे नेतृत्व द्या, अशी मागणी केली आहे.
आशिया चषकातील पाकिस्तानविरुद्धच्या सलामीचा सामना सोडता अन्य सर्व सामन्यांत जगात स्टार म्हणून मिरवणारे हिंदुस्थानी गोलंदाज पार फ्लॉप ठरले. अन्य संघांच्या नवख्या फलंदाजांनी त्यांच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतला. कधी काळी टीम इंडियाचा तारणहार ठरणाऱया भुवनेश्वर कुमारवर तर हिंदुस्थानी चाहते प्रचंड चिडले आहेत. कारण पाकिस्तान आणि श्रीलंकेविरुद्धच्या पराभवाचा तोच ‘व्हिलन’ असल्याचा दावा हिंदुस्थानी क्रिकेटशौकीन करीत आहेत. त्याने पाकिस्तानविरुद्धच्या सुपर-4 लढतीत 19व्या षटकात 19 धावांची खैरात वाटली आणि श्रीलंकेविरुद्धच्या लढतीत 19व्या षटकात नवख्या श्रीलंकन फलंदाजांना 14 धावा लुटू दिल्या. त्यामुळेच अनुभवी भुवनेश्वरला आता बसवा, अशी मागणी संतप्त क्रिकेटशौकीन ट्विटर आणि अन्य सोशल साईट्सवर करीत आहेत.
इतका फ्लॉप शो आशिया चषकात कधीच झाला नव्हता
टीम इंडिया नेहमीच आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतील विजेते पदासाठी फेवरीट संघ राहिला आहे. पण यंदा या संघाची जिगरच स्पर्धेत दिसली नाही. गोलंदाजांनी तर आपल्या अपयशी कामगिरीने संघाची लाजच काढल्याचे मत क्रिकेटशौकीन व्यक्त करीत आहेत. सुपर-4मध्ये पाकिस्तानकडून झालेला प्रभाव हिंदुस्थानी चाहत्यांच्या जिव्हारी लागला असून श्रीलंकेनेही आपल्या संघाला हरवले याचे दुःख त्यांच्या काळजाला सतत टोचत आहे. पहिल्या लढतीत तुफानी गोलंदाजी करणारा अष्टपैलू हार्दिक पांडय़ा आणि वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार नंतर गोलंदाजी विसरले की काय, असा सवाल हिंदुस्थानी चाहते करीत आहेत. भुवनेश्वरच्या फ्लॉप शोमुळे संतापलेले हिंदुस्थानी चाहते तर आता बस झाले भुवीचे लाड, त्याला बाहेर बसवा, अशी जोरदार मागणी करीत आहेत.
हिंदुस्थानी गोलंदाजांची झाली तुफान धुलाई
जगात टी-20मध्ये टॉपवर असणारा हिंदुस्थानी क्रिकेट संघ दुबईतील आशिया चषकात सध्या क्लब लेव्हलच्या संघापेक्षाही खराब खेळला, असे संतप्त हिंदुस्थानी क्रिकेट शौकिनांचे मत आहे. फलंदाजांनी धावा करूनही सुपर फ्लॉप हिंदुस्थानी गोलंदाजांनी विजयाची संधी गमावली. नवख्या फलंदाजांनी त्यांच्या गोलंदाजीचे वाभाडे काढत तुफान धुलाई केली असे दृश्य पाकिस्तान आणि श्रीलंकेविरुद्धच्या सुपर-4 लढतींत दिसले. त्यामुळे आपल्या संघावर हिंदुस्थानी चाहते प्रचंड संतापले आहेत. हिंदुस्थानी गोलंदाजी इतकी दुबळी कधीच नव्हती, अशी खंत अनेकांनी सोशल साईट्सवर व्यक्त केली आहे. या सर्वाला पैशांची उधळण करणारी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) कारणीभूत असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.
धोनीच्या कर्णधारपदाची स्तुती
यंदाच्या आशिया चषकात फलंदाज म्हणून रोहित शर्माची कामगिरी ठीक आहे. पण संघाला विजय मिळवून देण्यात मात्र त्याचे डावपेच कमी पडल्याची भावना चाहते व्यक्त करीत आहेत. पाकिस्तान आणि श्रीलंकेविरुद्धच्या लढतीत रोहितची व्यूहरचना संकटकाळात योग्य नव्हती. मोक्याच्या क्षणी गोलंदाजांची निवड करताना तो चुकला असेही अनेकांनी म्हटले आहे. काहींनी तर यापुढे जाऊन प्रतिस्पर्ध्याच्या तोंडातून विजय हिसकावून घेणाऱया माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला पुन्हा बोलवा, अशी अजब मागणी बीसीसीआयकडे केली आहे. दीपक चहर आणि श्रेयस अय्यर हे जिगरबाज खेळाडू फिट असताना त्यांना बेंचवर राखीव म्हणून बसवणे यात कुठला आलाय शहाणपणा, असा सवाल अनेकांनी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा यांना केला आहे.






























































