नगर शहरात 11 ठिकाणी कृत्रिम विसर्जन कुंड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर महापालिकेने गणेश विसर्जनाची जय्यत तयारी केली असून, शहरासह उपनगरांत एकूण 11 कृत्रिम विसर्जन कुंड तयार केली आहेत. परंपरेप्रमाणे विसर्जनासाठी वापरल्या जाणाऱया तीन विहिरींची स्वच्छता केली आहे. विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दलाने मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. रात्री 12 वाजेपर्यंत मिरवणूक संपविण्याची सूचना गणेश मंडळांना देण्यात आलेली आहे.

महापालिकेकडून यंदा 172 सार्वजनिक गणेश मंडळांनी परवानगी घेतलेली आहे. तसेच, घरोघरी ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना केली जाते. त्यामुळे विसर्जनाच्या दिवशी एकाच ठिकाणी गर्दी होऊ नये, यासाठी कृत्रिम कुंड तयार करण्यात आल्याचे शहर अभियंता सुरेश इथापे यांनी सांगितले. विसर्जन मार्गाचेही काही दिवसांपूर्वी पॅचिंग करण्यात आले आहे. विसर्जन मार्गावरून निघणाऱया मिरवणुकांना अडथळा ठरणारी अतिक्रमणे महापालिकेने हटविली आहेत.

येथे आहेत विसर्जन कुंड

बाळाजीबुवा विहीर, यशोदानगर विहीर (पाइपलाइन रोड), बोल्हेगाव गांधी नगर रोड, निर्मलनगर साईबाबा मंदिर खुली जागा, गंगा उद्यान मिस्किन मळा, नेप्ती नाका, साई उद्यान बुरुडगाव रोड, जुने मधुर मिलन मंगल कार्यालयाजवळ केडगाव, केडगाव देवी मंदिरासमोरील जागा, भूषणनगर लिंक रोड केडगाव, सारसनगर शिवनेरी चौक, स्टेशन रोड, गोविंदपुरा फकिरवाडा, भिस्तबाग महाल परिसर.

असा पोलीस बंदोबस्त

पोलीस उपअधीक्षक 3, पोलीस निरीक्षक 10, सहायक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक 31, पोलीस अंमलदार 481, होमगार्ड 205 तसेच दंगल नियंत्रक पथक, एसआरपीएफच्या तुकडय़ा असा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीवर पोलिसांचे बारीक्ष लक्ष राहणार आहे.