
>> गणेश आचवल
सध्या झी मराठीवर ‘अप्पी आमची कलेक्टर’ ही मालिका सुरू झाली आहे. या मालिकेत अर्जुन कदम ही व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता म्हणजे रोहित परशुराम. एकाच भूमिकेत विविध पंगोरे साकारत रोहित खऱया अर्थाने घराघरात पोचला आहे… एक प्रॉमिसिंग चेहरा!
रोहितचे शिक्षण भोर येथील शिवाजी विद्यालयात तर कॉलेजचे शिक्षण ‘राजगड ज्ञानपीठ कॉलेज ऑफ फार्मसी’मध्ये झाले. फार्मसीची पदवी मिळाल्यानंतर त्याने एका मल्टिनॅशनल पंपनीत नोकरीदेखील केली होती. पण त्यादरम्यान त्याची आवड होती शरीरसौष्ठव स्पर्धा. 2017 मध्ये त्यांनी राष्ट्रीय स्तरावरील शरीरसौष्ठव स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले होते. पुण्यामध्ये त्याने स्वतःची जिम सुरू केली होती. जवळजवळ 800 हून अधिक विद्यार्थ्यांना त्याने जिममध्ये प्रशिक्षण दिले होते.
2018 मध्ये अचानक एकदा रोहितच्या एका मित्राने त्याला एका मराठी चित्रपटासाठी ऑडिशन द्यायला सांगितली. रोहितला अभिनयाची आवड होती. त्याने ऑडिशन दिली, पण त्याचे वजन जास्त असल्याने त्याची निवड चित्रपटासाठी झाली नाही. वजन जास्त असल्याने आपण निवडले गेलो नाही, याचे त्याला वाईट वाटले आणि त्याने पुढील तीन महिन्यांत एकवीस किलो वजन कमी केले आणि पुन्हा त्याच मराठी चित्रपटासाठी ऑडिशन दिली. तो चित्रपट होता ‘मिथुन’ नावाचा आणि रोहितची त्या चित्रपटातील नकारात्मक व्यक्तिरेखेसाठी निवड झाली. 2019 मध्ये त्याने आपला जिम व्यवसाय बंद केला आणि मग अभिनयाचे रीतसर प्रशिक्षण घेण्याच्या उद्देशाने ‘विक्रम गोखले अभिनय प्रशिक्षण अॅकेडमी’मध्ये प्रवेश घेतला. विक्रम गोखले आणि राजाराम कोरे हे त्याचे गुरू. या अभिनय प्रशिक्षण अकादमीचा त्याला खूप फायदा झाला. मग विक्रम गोखले आणि राजाराम सरांच्या मार्गदर्शनाखाली त्याने ‘काजळमाया’ नामक प्रायोगिक नाटकात काम केले. त्या नाटकाचे संपूर्ण महाराष्ट्रात दौरे झाले. पुढे मग मुंबईला येऊन तो ऑडिशन देऊ लागला. ‘हिडन’, ‘रावण इज बॅक’ यामध्ये त्याने काम केलं. ‘फुलाला सुगंध मातीचा’मध्ये त्याने पॅडेट राहुलची भूमिका केली. ‘ज्ञानेश्वर माऊली’मध्ये त्याने एका भागात हनुमंताची भूमिका केली, तर पुढील काही भागात त्याने ‘बिदरचा बादशहा’ साकारला.
2022 हे वर्ष रोहितच्या आयुष्याला वेगळे वळण देणारे ठरले.‘अप्पी आमची कलेक्टर’मधील भूमिकेविषयी तो म्हणतो, या मालिकेत मी ‘अर्जुन कदम’ ही पोलिसाची व्यक्तिरेखा साकारत आहे. हा पूर्णपणे जॉली माणूस असून तो धूर्त आहे. हा चांगल्याशी चांगले आणि वाईटाशी वाईट वागणारा आहे. हा अतिशय संवेदनशील आहे, हळुवार नाती जपणारा आहे. एकाच भूमिकेत एवढे पंगोरे साकारताना खूप छान वाटते आणि या भूमिकेमुळे मी खऱया अर्थाने घराघरात पोचलो, असे मी म्हणेन.
सध्या रोहितचे शूटिंग सातारा परिसरात सुरू आहे. अधिकाधिक चांगल्या भूमिका करून आपली अधिक चांगली ओळख निर्माण करण्याचे त्याचे ध्येय आहे. या त्याच्या अभिनय प्रवासात त्याची पत्नी, त्याचे आई–वडील आणि मोठा भाऊ या सर्वांचा ठाम पाठिंबा होता आणि म्हणूनच तो इथपर्यंत पोचू शकला, हे तो आवर्जून सांगतो.


























































