श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

छत्रपती शिवाजी महाराजांचे बारावे वंशज व  सातारच्या राजघराण्यातील सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे शाहू महाराज भोसले (75) यांचे आज सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात कन्या वृषालीराजे, जावई, नातू असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी दुपारी एक वाजता संगम माहुली (सातारा) येथे कृष्णा-वेण्णा संगमावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

छत्रपती शिवाजीराजे गेल्या काही दिवसांपासून डेंग्यूमुळे आजारी होते. त्यांना उपचारार्थ पुणे येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, प्रकृती खालावल्याने गेल्या चार दिवसांत त्यांना जीवनरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले होते. त्यांचे शरीर औषधोपचारांना अपेक्षित प्रतिसाद देत नव्हते. यातच आज सायंकाळी पावणेसहा वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

छत्रपती शिवाजीराजे हे 1985 ते 1991 या काळात साताऱयाचे नगराध्यक्ष होते. त्या काळात त्यांनी भरीव रचनात्मक कार्य केल्याने त्यांची कारकीर्द संस्मरणीय ठरली. महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन असोसिएशनचेही ते उपाध्यक्ष होते. आजही विविध सामाजिक कार्यात आणि कार्यक्रमात त्यांचा सहभाग असे. अलीकडेच त्यांच्या पत्नी चंद्रलेखाराजे भोसले यांचेही निधन झाले. त्यामुळे कन्या वृषालीराजे त्यांच्यासमवेत राहून त्यांची काळजी घेत होत्या. छत्रपती शिवाजीराजे यांच्या आकस्मिक जाण्याने सातारकरांना मोठा धक्का बसला आहे.