
>> वैश्विक, [email protected]
आपण ज्याला ‘दिवस’ म्हणतो तो ‘दिवसा उजेडी’ म्हणजे उजेड अथवा प्रकाश दिसतो तेवढा काळ. दिवा या शब्दातच प्रकाश अंतर्भूत आहे. आपला नैमित्तिक दिवस सूर्याबरोबर मावळला की दुसऱया ‘दिवशी’च्या सूर्योदयापर्यंत रात्र असते. दिवस-रात्रीच्या सीमेवरचा काळ म्हणजे पहाट (उषःकाल) आणि संध्याकाळ. परंतु आज जगभर प्रचलित असलेल्या सौर कॅलेंडरमधला दिवस किंवा दिनांक रात्री बारा वाजता सुरू होतो आणि त्या दिवसाची सायंकाळ उलटून पुन्हा मध्यरात्री बारा वाजेपर्यंत तोच राहतो. आपला चांद्र पंचांगानुसार दिवस सूर्योदय ते सूर्योदय असा असतो. त्याला आपण तिथी म्हणतो.
आधी म्हटल्यानुसार चंद्रभमणाचा महिना सणासुदींसाठी योग्यच असला तरी व्यवहारात आपण सौर कॅलेंडर वापरतो. त्यामुळे तो दिवस बरोबर चोवीस तासांचा होतो. हे चोवीस तास म्हणजे पृथ्वीची स्वतःभोवती (अक्षाभोवती) फिरण्याची गती. या गतीने एक दिवस या गणनेने 365 दिवस झाले की पृथ्वीची सूर्याभोवतीची फेरी पूर्ण होते. त्यामुळे हे कॅलेंडर जागतिक होऊ शकतं. आपल्याकडचा सूर्याशी निगडित एकमेव सण ‘संक्रात’ 14 जानेवारीला येतो तो पृथ्वीच्या या सूर्याभोवती फिरण्याच्या गतीमुळेच. आता त्यातही वसंतसंपातबिंदू दर 72 वर्षांनी एक अंश मागे जात असल्याने सूर्याच्या पार्श्वभूमीवरच्या राशी वा नक्षत्रात शेकडो वर्षांनी बदल होऊन संक्रांतीची तारीख बदलू शकते, पण विज्ञानात घडणारी गोष्ट व्यवहारात यायला समाजाची मानसिक तयारी होण्यात बराच काळ जातो. त्यासाठी विज्ञान-वापराबरोबरच विज्ञान-विचार रुजण्याची गरज असते. पण लक्षात कोण घेतो? ते असू द्या. या वर्षी गेल्या 29 जून रोजी आपला चोवीस तासांचा (खरं तर 23 तास 56 मिनिटांचा) दिवस थोडा कमी झाला! कारण? कारण असं की, पृथ्वी स्वतःभोवती वेगाने फिरली. अगदीच गरागरा नव्हे, पण नगण्य वेळा. पृथ्वीने जो वेग वाढवला तो ऍटोमिक, इलेक्ट्रॉनिक घडय़ाळाने नैनो सेकंदापर्यंत टिपला आणि त्यातूनच पृथ्वीची गती त्या दिवशी (तरी) वाढण्याचं दिसून आलं.
याविषयी वाचण्यापूर्वी पृथ्वी स्वतःभोवती किती गतीने फिरते ते जाणून घेऊ. पृथ्वीची दिवसाची (सध्याची) तंतोतंत गती 23 तास 56 मिनिटं आणि 4.09053 सेकंद इतकी आहे. आता हा मायक्रोसेकंदाचा हिशेब सर्वसामान्यांच्या लक्षात राहणंच कठीण. वरची चार मिनिटंही सोडून आपण ढोबळमनाने पृथ्वीचा स्वतःभोवती फिरण्याचा वेग चोवीस तासांचा आहे असं म्हणतो तेही दैनंदिन व्यवहारांपुरतं योग्यच. पण वैज्ञानिक प्रयोगात, वेळेचं गणित महत्त्वाचं असणाऱया यंत्रसामुग्रीत (म्हणजे, कम्प्युटरपासून रॉकेटच्या उलट गणितीपर्यंत वगैरे) वेळेत किंचितही दोष चालत नाही. पृथ्वीचा स्वतःचा अक्षाभोवती फिरण्याचा वेळ सेकंदाला 460 मीटर म्हणजे तासाला 1609 किलोमीटर एवढा आहे. पृथ्वीचा व्यास 12,800 किलोमीटर असून विषुववृत्तावरचा परिघ 40,075 किलोमीटर इतका असल्याने अवाढव्य पृथ्वी क्षणभरात स्वतःभोवती गिरकी घेऊ शकत नाही. माणसापेक्षा हत्तीलाही स्वतःभोवती गिरकी घ्यायला वेळ लागतो. यावरून हे लक्षात येईल, या मोजमापाने पृथ्वीच्या आकारमानानुसार ती स्वतःभोवती 24 तासांत फिरते, परंतु गेल्या 29 जूनला ही गती 1.59 मिलिसेकंदांनी घटली, याचा अर्थ त्या दिवशी पृथ्वीची आत्मगती वाढली.
आता 1.59 मिलिसेकंद ही आपल्या दृष्टीने अगदीच नगण्य गोष्ट, परंतु हे घडलं कशामुळे? तर पृथ्वी स्वतःभोवती फिरताना फिरणाऱया भोवऱयासारखी किंचित डुलते! भोवरा फिरवला असेल तर आठवून पाहा. आरीवर गरगर फिरणाऱया भोवऱयाचा वरचा मध्यभाग जर वर आलेला असेल (डिझाइननुसार) तर तो एक वेगळंच सूक्ष्म वर्तुळ तयार करताना दिसेल. पृथ्वीच्या या गतीला ‘प्रिसेशन’ किंवा परांचन गती म्हणतात. पृथ्वीच्या आकारामुळे तिच्या ध्रुवीय टोकाचा अक्षबिंद 26 हजार वर्षांत एक वर्तुळ करतो. त्यामुळे आज ज्याकडे उत्तर ध्रुव रोखला आहे तो तारा 26 हजार वर्षांत हळूहळू बदलतो.
संशोधकांच्या मते पृथ्वीच्या या परांचन गतीमध्ये केव्हातरी किंचित थरथर (व्हॉबल) निर्माण होते. सहाजिकच दिवसाचा कालावधी सूक्ष्म गणनेने कमी होतो. ही एक वैज्ञानिक गंमत आहे असे समजून जाणून घ्या. पण अभ्यासकांच्या दृष्टीने ते महत्त्वाचं अशासाठी की त्यामुळे नॅनोसेकंद मोजणाऱया ऍटोमिक घडय़ाळांना चकवा मिळतो आणि कम्प्युटर प्रोग्रॅमिंग, सॅटेलाइट, सेलफोन सिस्टीम अशा अनेक इलेक्ट्रॉनिक यंत्रांवर परिणाम होऊ शकतो. ‘वायटूके’चा प्रकार आठवतो ना? तोही कालगणनेशीच निगडित होता.
सुमारे साडेचार अब्ज वर्षांपूर्वी आपली पृथ्वी सूर्यापासून जन्माला आली. त्यावेळी पृथ्वीचा स्वतःभोवती फिरण्याचा वेग खूपच जास्त होता. म्हणजे दिवस 24 तासांऐवजी 7 ते 8 तासांचाच असायचा. त्या काळात वर्षाचे अमूक महिने असा प्रकार नव्हता. कारण एकतर प्रगत मानवी वस्ती नव्हती आणि चंद्रही पृथ्वीपासून सध्याच्या अंतरावर आहे त्यापेक्षा काहीसा जवळ होता असं म्हटलं जातं. सूर्य-पृथ्वी-चंद्र यांच्या ‘नात्या’तल्या अशा अनेक विस्मयकारक गोष्टी आहेत. त्यातलीच एक पृथ्वीची गती, ती यत्किंचित मंदावली म्हणून हा लेखनप्रपंच.





























































