
शिवसेनेतून फुटल्यानंतर आमदार प्रताप सरनाईक यांच्यावरील घोटाळय़ांच्या आरोपांसंदर्भात ईडीने क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे. यावर बोलताना राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी ही भारतीय जनता पार्टी नव्हे तर भारतीय जनता लाँड्री असल्याची जोरदार टीका भाजपवर केली आहे.
पुणे येथे पत्रकारांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, मी महिला खासदार म्हणून संसदेत हा मुद्दा उपस्थित करणार आहे आणि हा सवाल अमित शहा यांना विचारणार आहे की, प्रताप सरनाईक यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले होते. आपण भाजपसोबत जाऊया. म्हणजे आपल्यावरचे ईडी, सीबीआय आरोप बंद होतील. ज्यांच्यावर आरोप झाले ज्यांच्या घरात रेड झाली, त्यांचं कुटुंब कोणत्या परिस्थितीतून गेलं याचा विचार कधी केला का? आणि आता तुम्ही म्हणता की, त्यांच्या विरोधात काहीच पुरावे नाहीत. या प्रकरणात तुम्ही आधी आरोप केले ते खोटे होते का? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला आहे. म्हणून आता या प्रकरणात भारतीय जनता पार्टीने सरनाईक कुटुंबीयांची हात जोडून माफी मागावी आणि जर त्यांच्यावर झालेले आरोप खोटे असतील तर भाजपने महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली.



























































