
नाथसमाधी मंदिराच्या मागे असलेल्या मोक्ष घाटावरील दशक्रिया विधी पूर्ववत सुरू करण्यात आले आहेत. जायकवाडी धरणातून प्रतिसेकंद सव्वा लाख क्युसेकने पाणी सोडल्यामुळे हा घाट पाण्याखाली गेला होता. आज 47 हजार क्युसेकचा जलविसर्ग केल्यानंतर घाट उघडा पडला आहे.
नाथसागरातून सध्या 47 हजार 660 क्युसेकने पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीत करण्यात येत आहे. त्यामुळे नदीतीरावर असलेला मोक्षघाट उघडा पडला आहे. दोन दिवसांपूर्वी सव्वा लाख क्युसेकने पाणी सोडावे लागले होते. परिणामी नदीचा फुगवटा वाढून मोक्षघाट पाण्याखाली बुडाला होता. त्यामुळे नगर परिषद प्रशासनाने घाटावर चालणारे धार्मिक विधी काही दिवसासाठी बंद केले होते.
या पार्श्वभूमीवर आता नाथसागरातून नदीत होणारा पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला असल्याने पैठण येथील मोक्ष घाट नागरिकांना धार्मिक व दशक्रिया विधी करण्यासाठी खुला करण्यात आला आहे. सध्याही घाटाच्या काठोकाठ पाणी आहे. त्यामुळे येथे आलेल्या सर्वच नागरिकांनी खोल पाण्यात जाऊ नये. तसेच पाणी वाहते असल्याने पोहण्यास जाऊ नये, अशा सूचना नगर परिषद प्रशासक तथा मुख्याधिकारी संतोष आगळे यांनी दिल्या आहेत.


























































