
मुंबईचा युवा फलंदाज यशस्वी जैसवालने दुलीप ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात दक्षिण विभागाविरुद्ध द्विशतकी खेळी करून नव्या ऐतिहासिक कामगिरीला गवसणी घातली आहे. पश्चिम विभागाकडून खेळताना यशस्वीने दुसऱया डावात नाबाद 209 धावांची खेळी करत 1962 साली अजित वाडेकर यांनी रचलेला विक्रम मोडीत काढला.
पश्चिम विभाग व दक्षिण विभाग यांच्यातील कोईम्बतूर येथे खेळवण्यात येत असलेल्या अंतिम सामन्यात दक्षिण विभागाने पहिल्या डावात 57 धावांनी आघाडी घेतली आहे. मात्र पश्चिम विभागाने दुसऱया डावात उत्तम खेळाच्या जोरावर तिसऱया दिवसअखेर 315 धावांची भक्कम आघाडी घेतली आहे. यामध्ये यशस्वीच्या द्विशतकाचा समावेश आहे. यशस्वीने शुक्रवारी सामन्याच्या तिसऱया दिवशी 244 चेंडूंमध्ये 209 धावांची खेळी केली.
हेत पटेल 98 धावा व जयदेव उनाडकटच्या 47 धावांच्या जोरावर पश्चिम विभागाने पहिल्या डावात 270 धावांपर्यंत मजल मारली होती. त्यामुळे दक्षिणेला पहिल्या डावात 327 धावांपर्यंत मजल मारून आघाडी घेता आली होती.
यशस्वीची विक्रमाला गवसणी
यशस्वीने दुलीप चषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत नॉर्थ ईस्ट झोनविरुद्धही द्विशतक झळकावले होते. प्रथम श्रेणी क्रिकेटच्या अंतिम सामन्यात द्विशतक झळकावणारा तो हिंदुस्थानचा युवा फलंदाज ठरला. अजित वाडेकर यांनी 1962 मध्ये राजस्थानविरुद्ध 20 वर्षे व 354 दिवसांचे असताना द्विशतक झळकावले होते. यशस्वी आज 20 वर्षे व 269 दिवसांचा आहे.
अय्यर–जैसवाल यांनी डाव सावरला
वेस्ट झोनचा कर्णधार अजिंक्य रहाणे दुसऱया डावातही अपयशी ठरला. यशस्वी व प्रियांक पांचाळ यांनी पहिल्या विकेटसाठी 110 धावांची भागीदारी करून वेस्ट झोनला चांगली सुरुवात करून दिली. प्रियांक 40 धावांवर बाद झाला. त्यानंतर यशस्वी व श्रेयस अय्यरची जोडी जमली. त्यांनी तिसऱया विकेटसाठी 167 धावांची भागीदारी करताना संघाला तीनशेपार नेले. श्रेयस 71 धावांवर बाद झाला. यशस्वीने एक बाजू सांभाळून धरत 244 चेंडूंत 23 चौकार व 3 षटकारांसह 209 धावा करताना संघाला 3 बाद 376 धावांपर्यंत पोहचवले. त्याच्या या द्विशतकी खेळीच्या जोरावर वेस्ट झोनने 319 धावांची आघाडी घेतली आहे.

























































