
>> दिलीप जोशी
एका खूप परिचित व्यक्तीच्या घरातल्या मनमोकळय़ा गप्पांचा ‘फील’ त्या दिवशी दीदी तुम्ही आम्हाला दिलात. अडतीस वर्षांपूर्वीचं रेकॉर्डिंग बऱयापैकी आहेच, पण मनात भरलेला तुमचा स्वर चिरंतन आहे.
दीदी नमस्कार…’ असं मी भारावलेल्या अवस्थेत म्हटलं आणि तुम्ही हसून, तुमच्या विश्वविख्यात मंजुळ स्वरात स्वागत केलंत ‘नमस्कार या…’
आठवतं दीदी? ही गोष्ट बुधवार, 28 मार्च, 1984 या दिवशीची. सकाळी अकराच्या सुमारास मी आणि संपादक वसुंधरा पेंडसे-नाईक तुमच्या घरी ‘प्रभु पुंज’मध्ये आलो होतो. ‘आठवतं?’ असं आपलं उगाच विचारलं. हजारो चाहत्यांना सतत सात-आठ दशपं भेटण्यात तुमची कारकीर्द गेली. अनेक पत्रकारही भेटले असतीलच. कुणाकुणाचं स्मरण राहाणार?… पण आमच्या दृष्टीने तो अजरामर क्षण होता. तो तसाच जपावा म्हणून मी टेपरेकॉर्डर आणला होता. धास्तावूनच विचारलं, ‘आपण मुलाखत टेप करूया?’…आणि तुम्ही सहज म्हणालात, ‘अहो करा ना… कुठं ठेवायचा रेकॉर्डर?’ रेकॉर्डर तुमच्याजवळ ठेवला. तुमचा गद्य स्वरातलासुद्धा सुरेलपणा टिपून घ्यायचा होता. पहिला प्रश्न विचारल्यावर लक्षात आलं की बाहेर पेडर रोडवरून वाहनांचे कर्कश आवाज येतायत. ‘काय करूया?’ मी विचारलं.
‘थांबा, खिडक्या बंद करू का? मी करते…’ म्हणत तुम्ही चट्कन उठलात आणि खिडक्या लावून घेतल्यात… तोही आवाज टेप झाला. दिदी कोणीतरी सांगितलं होतं… बघ बाबा, त्या बोलतील का पण मोकळेपणाने?…
प्रश्न काय दिदी तसे नेहमीचेच होते. त्यापूर्वीही तुमच्या शेकडो मुलाखती प्रसिद्ध झाल्या होत्या. ‘तुमची स्वतःची आवडती दहा गाणी कोणती?’ या छापाचं आम्हालाही काही विचारायचं नव्हतं. मुळात मुलाखतीचं कारण होतं ते तुम्ही बाबा आमटेंच्या ‘आनंदवना’साठी मुंबईत करत असलेल्या कार्यक्रमाचं. दोन दिवस आधीच मी तुम्हाला मोजक्या पत्रकारांच्या परिषदेत भेटलो होतो. त्यावेळी तिथे तुम्ही विजय मर्चंट, आदित्य विक्रम बिर्ला, हृदयनाथजी यांच्यासमवेत अनौपचारिक गप्पा होतायत यावर माझाच विश्वास बसत नव्हता. मला कळायला लागल्यापासून रेडिओवरून कानावर येणारा आवाज मी नुसता ऐकत नव्हतो, तर संभाषण करता येत होतं. माझा मलाच हेवा वाटला.
मग लगेच मुलाखतीचं ठरलं. वसुंधराताईंचा आणि तुमचा, तुम्ही नाना चौकात राहात होतात तेव्हापासूनचा परिचय. त्यांनीच वेळ ठरवली… आणि पुलंच्या भाषेत ‘अवकाश व्यापून राहिलेला स्वर’ ध्वनिमुद्रित होऊ लागला. एक प्रश्न बराच काळ मनात होता. ‘आनंदघन म्हणून तुम्ही नंतरही सातत्याने संगीत का दिलं नाही?’
यावर तुम्ही म्हणालात, ते योगायोगाने झालं. कुणा संगीतकाराने बाबांना (म्हणजे भालजी पेंढारकरांना) नकार दिला, तेव्हा मला राग आला. मी बाबांना म्हटलं- ‘मी (संगीत) करू का?… पण नाव नाही देणार… आनंदघन कसं वाटतंय…’ नि बाबा म्हणाले, कर ना…’ यावर वसुंधराताई उद्गारल्या- ‘मग दिदी असा ‘राग’ पुन्हा कधी येणार?’ तुम्ही खळखळून हसलात! अनेक गाण्यांमध्ये डोकावलेलं तुमचं ते प्रसिद्ध सुरेल हसणं… गंमत वाटली… टेप सुरूच होती.
मग काही प्रश्न. एक नाटय़गीताचा… तुम्ही म्हणालात, माझी कारकीर्दच बाबांबरोबर (मास्टर दीनानाथ) नाटय़संगीतानेच सुरू झाली माहितेय ना… आमचं ‘होमवर्क’ बरं असावं. आम्हाला तुमची एका नाटकातली ‘नारदा’ची भूमिका ठाऊक होती.
इंग्लिश गाण्यांचा विषय निघताच तुम्ही म्हणालात ते करायचं तर सुरुवातीपासूनच तशी तालीम हवी. तरी त्यांच्या सुप्रानो किंवा ‘नॅट पिंग कोल्’सारखं ‘सॉफ्ट’ गाणं करायचा विचार आहे… मग तुमच्या काही इंग्लिश गाण्यांचं ध्वनिमुद्रणही झाल्याचं ऐकलं. शास्त्रीय संगीताचा विषय निघाला नि तुम्ही एकदम आठवल्यासारखं म्हणालात, ‘मी भीमसेनजींबरोबर खळय़ांकडे एक भजनाचं रेकॉर्डिंग करतेय… छान आहे ना कल्पना?’…आम्ही अवाक. पुढे या दोन भारतरत्नांचा राम-शाम गुणगान आल्बम आला. शास्त्रीय संगीत, जुनं-नवं सिनेसंगीत यावर बरंच बोलणं, तुमची मतं, संगीतकार, गायकांविषयीचे अनुभव असं सगळं चाललं होतं. मुलाखतीच्या सुरुवातीला तुम्ही घरात स्पष्टच सांगितलं होतं की ‘फोन आला तर तिकडे भारतीला घ्यायला सांगा. आता इथे कुणी डिस्टर्ब करू नका.’
तरी कोणी कोणी येतच होते. तेवढय़ात अनुप जलोटा आले. तुम्हाला नमस्कार करून दूर मुलाखत ऐकत बसले. मग घरातली मुलं परीक्षेला जाण्याआधी नमस्कार करायला आली. (मार्च महिना असल्याने वार्षिक परीक्षेचा मोसम होता.) तुम्ही ‘परीक्षा?… गुडलक’ असा तुमच्या प्रसिद्ध ‘हाय पीच’मधे आशीर्वाद दिलात. तोही रेकॉर्ड झाला.
एका खूप परिचित व्यक्तीच्या घरातल्या मनमोकळय़ा गप्पांचा ‘फील’ त्या दिवशी दिदी तुम्ही आम्हाला दिलात. अडतीस वर्षांपूर्वीचं रेकॉर्डिंग बऱ्यापैकी आहेच, पण मनात भरलेला तुमचा स्वर चिरंतन आहे. परवा 28 तारखेला तुमची पहिली ‘जयंती’ म्हणताना जड जातंय. तुमच्यासारख्यांचं अस्तित्व हाच समाजाचा मोठा आधार असतो. स्वरातून तुम्ही ते उदंड संचित आमच्यासाठी ठेवलंय हे खरंच. लता दिदी, आम्ही कृतज्ञ आहोत!






























































