महावितरणच्या ट्रान्सफार्मरची चोरी करणाऱ्या दोघांना अटक, सातारा गुन्हे शाखेची कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सातारा जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या ट्रान्सफॉर्मर चोरीप्रकरणी दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने गजाआड केले. दरम्यान, संशयितांकडून पोलिसांनी 1 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

अतिक्रमण विजय काळे (वय 30, रा. रेवडी, ता. कोरेगाव) व आकाश प्रकाश भोसले (वय 32, रा. मर्ढे, ता. सातारा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. सातारा शहर, उपनगरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी ट्रान्सफॉर्मर फोडून त्यातील तांब्याची तार व ऑइल चोरीचे प्रमाण वाढले आहे. हे कृत्य एका टोळीकडून होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी सापळा लावला. त्यानुसार संशयित चोरीचे साहित्य घेऊन करंजे नाका परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. संशयित आल्यानंतर पोलिसांनी त्यांची धरपकड केली. प्राथमिक चौकशी केल्यानंतर त्यांनी चोरीची कबुली देऊन चोरी केलेले साहित्य लपवून ठेवल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी चोरीचे साहित्य ताब्यात घेऊन संशयितांना अटक केली. एकूण 226 किलोच्या ट्रान्सफॉर्मर तारा मिळून आल्या आहेत. संशयितांनी चार वर्षांच्या कालावधीत सातारा व वाई तालुक्यामध्ये चोऱया केल्या आहेत. एकूण 6 गुन्हे उघड आले असून, संशयितांकडे कसून चौकशी केली जात आहे.

जिल्हा पोलीसप्रमुख अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱहाडे, पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, फौजदार अमित पाटील, मदन फाळके, मधुकर गुरव, पोलीस उत्तम दबडे, तानाजी माने, आतिष
घाडगे, शरद बेबले, प्रवीण फडतरे, गणेश कापरे, नीलेश काटकर, रोहित निकम, सचिन ससाणे, शिवाजी गुरव, गणेश कचरे यांनी कारवाईत सहभाग घेतला.