
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या आज धाराशिव येथे एका कार्यक्रमासाठी दाखल झाल्या होत्या. यावेळी त्यांनी तुळजाभवानी मातेचं दर्शन घेतलं. यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. PFI वरील बंदीवरून त्यांना विचारण्यात आलेल्या महत्त्वाच्या प्रश्नावरून त्या म्हणाल्या, ‘काही विषय राष्ट्रीय सुरक्षेचे असतात. त्यात राजकारण कुणी आणू नये. राष्ट्रीय सुरक्षा ही राजकारणापेक्षा वेगळी असली पाहिजे. जे देशाच्या हिताचं असतं त्याकडे सत्तेत असणाऱ्यांनी पारदर्शकपणे पाहिलं पाहिजे’.
संविधानाच्या चौकटीत देश चालला पाहिजे!
आरएसएसवरही बंदी घाला अशा मागणीवर राष्ट्रवादी काँग्रेसचं मत काय असं विचारल्यावर, ‘संविधानाच्या चौकटीत देश चालला पाहिजे’ असं उत्तर त्यांनी दिलं.
मी आशीर्वाद घ्यायला येते…
मी साकडं घालायला येत नाही, मी आशीर्वाद घ्यायला येते. काही महिन्यांपूर्वी धाराशिव येथे येण्याचा योग आला होता तेव्हाही मी येथे आले होते. आजही कार्यक्रमानिमित्त इथे आले आहे. तेव्हा इथे आल्यानंतर तुळजा भवानीचा आशीर्वाद मिळणं ही एक भाग्याची गोष्ट आहे. म्हणून आम्ही सगळे मिळून देवीच्या दर्शनाला आलो.





























































