
>> प्रा. अनिल कवठेकर
प्रतीके ही सौंदर्याची परिमाणे आहेत. प्रतीकांमुळे खूप काही बोलण्याची, सांगण्याची आवश्यकता नसते. एका छोटय़ाशा प्रतीकातून खूप मोठा अर्थ आपण आपापल्या परीने लावू शकतो आणि स्वतः अर्थ लावण्यातच खरी गंमत असते. तरीही त्या प्रतीकांचा बेसिक अर्थ प्रत्येकाला माहीत असणे आवश्यक आहे. आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे ती प्रतीके वैश्विक आहेत. सर्वच प्रतीकांचा अर्थ सर्वच देशांमध्ये सारखा आहे. या लेखात आपण राज कपूरच्या ‘जिस देश मे गंगा बहती है’ या 1960 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील एका गाण्यातल्या दृष्यावर राजसाहेबांनी किती मेहनत घेतली होती आणि त्यामुळे त्या गाण्यातले सौंदर्य, त्याची परिणामकारकता कशी वाढली ते पाहू या.
जसे सूर्य हे तेजाचे प्रतीक आहे, तर चंद्र हे शीतलतेचे प्रतीक आहे आणि फूल हे कोमलतेचे. अशी असंख्य प्रतीके आहेत, जी चित्रपट माध्यमातून कला दिग्दर्शक एखाद्या दृष्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी, त्यातल्या संवादाची परिणामकारकता साधण्यासाठी वापरत असतो. काही वेळा आपल्याला ते दृष्य खूप आवडते, पण ते का आवडले हे सांगता येत नाही. राज कपूर यांच्या ‘जिस देश मे गंगा बहती है’ या 1960 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटातल्या एका गाण्यातल्या दृष्यावर राजसाहेबांनी किती मेहनत घेतली होती आणि त्यामुळे त्या गाण्यातले सौंदर्य, त्याची परिणामकारकता कशी वाढली ते पाहू या.
राजूने (राज कपूर) डापूंच्या सरदाराचे प्राण वाचवले आहेत आणि त्यामुळे त्याला डापूंच्या अड्डय़ावर राहण्याची संधी मिळते. तिथे त्याला राहण्यासाठी एक खोली देण्यात येते. त्या खोलीमध्ये एक भुसा भरलेला वाघ ठेवलेला असतो. त्याला पाहून राजू खूप घाबरतो. सरदाराची मुलगी त्याला समजावून सांगते की, हा खरा नाही तर भुसा भरलेला वाघ आहे.
राज कपूर यांनी जाणीवपूर्वक त्या डापूंच्या अड्डय़ावर तो भुसा भरलेला वाघ आणलेला आहे. मुळातच ज्यांचे जीवन धावपळीचे आहे, ज्यांना कायम पोलिसांची भीती आहे अशा डापूंना आपल्या गुहेमध्ये मृत वाघाच्या शरीरात भुसा भरून ठेवण्याची गरज काय? पण त्या प्रतीकातून दिग्दर्शक प्रेक्षकांना सांगतो की, जसा हा वाघ निरुपद्रवी आहे तशीच ही माणसेसुद्धा निरुपद्रवी आहेत. जरी ही वरून क्रूर वाटत असलीत तरा आतून त्यांच्यामध्ये असाच भीतीचा भुसा भरलेला आहे.
‘होठो पे सच्चाई रहती है
जहां दिल में सफाई रहती है…’
हे गाणे डापूंच्या अड्डय़ावर सुरू होण्यापूर्वी अडीच मिनिटे राज कपूरने डफ वाजवलेला आहे आणि या अडीच मिनिटांत ज्या त्वेषाने डफ वाजवला आहे, त्या वाजवण्याला असणारी गती आणि ते वाजवणे याच्यात कुठेही ताल सुटलेला जाणवत नाही. त्यांचा सफाईदार अभिनय पाहता जणू ते वाद्य त्यांना खूप चांगल्या प्रकारे वाजवता येते असेच आपल्याला पाहताना जाणवते. असे म्हणतात की, राजसाहेबांना अनेक वाद्ये वाजवायची चांगली माहिती होती आणि म्हणूनच त्यांनी त्यांच्या चित्रपटांमध्ये अशा वाद्यांचा सुंदर उपयोग करून घेतला होता.
राजूच्या डफ वाजवण्याबरोबर त्या अडीच मिनिटांत बऱयाच घटना पडद्यावर घडताना दिसतात आणि हे गाणे सुरू होते… होठो पे सच्चाई रहती है.
राजू डफ वाजवायला सुरुवात करतो आणि अड्डय़ावर अत्यंत क्रूर वाटणाऱ्या चेहऱ्याची, मोठमोठय़ा मिश्या असणारी, पोलादी शरीराची डाकू मंडळी आपापल्या कामांमध्ये मग्न आहेत. डफाचा आवाज आल्याबरोबर क्षणभर सगळेच थांबतात. राजूवर रोखलेल्या बंदुका त्या डफाच्या ध्वनीने खाली येतात. एक आठ-नऊ वर्षांची परकर-पोलक्यातली लहान मुलगी डफलीवर नाचण्याचा ताल धरते. तिच्यापेक्षा थोडा मोठा असणारा मुलगा दातात तार धरून त्यात ताणलेल्या तारेवर नाद निर्माण करून राजूच्या डफलीला साथ देतो. दूरवरून पाणी घेऊन येणाऱया तीन तरुणी डफाचा आवाज ऐकून तिथेच थबकतात. एकीच्या हातून तिचा माठ खाली पडून फुटता. पण तिचे त्या फुटलेल्या माठाकडे लक्ष नसते. ती राजूकडे हात दाखवून दर्शवते की, तिकडे काय चालले आहे. हळूहळू त्या डफाच्या तालावर लहान मुले अचूक ताल पकडून नाचायला लागतात. तरुण मंडळी आपल्या बायकांना घेऊन नाचायला उतरतात. त्या तरुणी हातात पितळेची ताटे घेऊन ती विशिष्ट तालात एकमेकांवर आपटून एक ध्वनी निर्माण करतात आणि तो ध्वनी त्या डापूंच्या अड्डय़ाला, त्यांच्या स्वभावाला साजेसे संगीत देण्यास मदत करतो. लोहारकाम करणारे डफाच्या ठेक्यात घणावर घण मारतात. नायिका तयार होताना तिच्या चोळीची गाठ मारत आहे. तिच्या बोटात ते संगीत भिनले आहे. त्यामुळे ती गाठ मारताना डफाचा ठेका पकडून सुंदर पद्धतीने गाठ मारते. ती सुंदर पद्धत पडद्यावर पाहतानाच लक्षात येते. कारण अनेकदा जे दिसते ते तसेच्या तसे शब्दांत मांडता येत नाही.
एक लहान मुलगा त्याच्या घराच्या कोपऱयात पडलेली ढोलकी ओढत घेऊन पुढे येतो आणि आपल्या बापाला ती वाजवायला सांगतो. बाप ती ढोलकी गळ्यात बांधून वाजवायला लागतो. संगीत-नृत्यापासून दूर गेलेली सगळी मंडळी राजूच्या डफलीच्या तालावर नाचायला सुरुवात करतात. जणू अनेक वर्षे शांत असलेला ज्वालामुखी पृथ्वीच्या पोटातून खदखदून बाहेर यावा तसा अनेक वर्षे डापूंच्या अंतःकरणात लपलेला नृत्याचा ज्वालामुखी डफाच्या तालावर बाहेर येतो आणि अत्यंत वेगाने आणि दणकटपणे ते नृत्य करू लागतात. हातात बंदूक असणारे बंदूक घेऊन नाचू लागतात. नाचण्याची गती वाढत जाते. कोणत्याही गीताशिवाय, शब्दाशिवाय नृत्य चालू राहते आणि अडीच मिनिटांनंतर राजू आपली डफली वाजवणे थांबवतो. त्यानंतर ‘होठो पे सच्चाई रहती है…’ या गाण्याला प्रारंभ होतो,
या गाण्याचा परिणाम साधण्याकरता डापूंची अवस्था, त्यांचे जगणे, त्यांच्या जीवनातून हरवलेला आनंद, त्यांच्या मुलांना काय वाटते, त्यांच्यातल्या तरुणांना काय वाटते, हे सगळे शब्दातून सांगत बसण्याऐवजी राजसाहेबांनी ते प्रतीकांच्या माध्यमातून सुंदर पद्धतीने पेक्षकांसमोर आणलेले आहे. ते जेव्हा उलगडत जाते तेव्हा ते गाणे पाहण्याचा आनंद खूप वेगळा आहे. एखादा दिग्दर्शक एखाद्या गाण्याकरता किती मेहनत घेते हे राज कपूर यांच्या या गीतातल्या दृश्यातून जेव्हा लक्षात येते तेव्हा ‘शो मॅन’ का म्हणतात, याचे उत्तर मिळते.
(लेखक चित्रपट अभ्यासक आहेत)




























































