
मो. ग. रांगणेकर यांच्या नाटय़निकेतन संस्थेतर्फे रंगभूमीवर आलेल्या ‘तो मी नव्हेच’ या नाटकाने इतिहास घडवला. तीन हजारांहून अधिक प्रयोगांमध्ये पंचरंगी भूमिका साकारणाऱ्या प्रभाकर पणशीकर यांना या नाटकाने नावलौकिक प्राप्त करून दिला. त्यांनी साकारलेला लखोबा लोखंडे अजरामर ठरला. 8 ऑक्टोबर 1962 रोजी दिल्लीच्या आयफॅक्स नाटय़गृहात ‘तो मी नव्हेच’ नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग झाला होता. येत्या 8 ऑक्टोबर रोजी या नाटकाला 60 वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक अशोक समेळ यांनी त्यांचे सुहृद आणि ज्येष्ठ कलाकार प्रभाकर पणशीकर यांच्याविषयी जागवलेल्या आठवणी.
एक संध्याकाळ 1981-82 मधली. स्थळ ः दादर ‘नाटय़संपदेचे’ ऑफिस. ‘नाटय़संपदेचे’ सर्वेसर्वा नटसम्राट प्रभाकर पणशीकर यांच्याशी मी गप्पा मारत होतो. एवढय़ात एक फोन आला. फोन होता प्रभाकर पणशीकरांचे गुरू श्री. मो. ग. रांगणेकरांचा. ते तिथून काही बोलले. त्याला पंत प्रभाकर पणशीकरांनी उत्तर दिलं. फोन ठेवला व मला म्हणाले, ‘‘अशोक उद्या तू संध्याकाळी आहेस?’’ मी ‘हो’ म्हटलं. मग मला म्हणाले, ‘‘उद्या मो. ग. रांगणेकर यांनी लिहिलेलं संगीत नाटक वाचायला येणार आहेत. मी ऐकलेलं आहे. शिवाय ते माझे गुरुवर्य असल्यामुळे त्यांच्या नाटकात चुका काढू शकत नाही. पण तू त्यांना त्यांच्या नाटकाबद्दल बरंवाईट कसं वाटलं? ते सांग अगदी स्पष्टपणे!’’ मी हसलो. तशी आम्ही दोघं अनेक नाटककारांची नाटकं एकत्र ऐकायचो. तसा मामला सरळ होता. पण उद्या मो. ग. रांगणेकरांना मी ऐकणं आणि प्रेक्षक म्हणून शेरा देणं तसं मला अवघड वाटलं. पण पंत (प्रभाकर पणशीकर यांना जवळचे लोक ‘पंत’ म्हणायचे त्यात मी पण होतो.) म्हणाले, ‘‘अगदी बेधडक सांग.’’ असं म्हणून एखाद्या लहान मुलासारखे खळखळून निरागसपणं मोठय़ानं हसू लागले… आणि पंत त्यांच्या स्मृतिपटलात गेले, पार भूतकाळात. गिरगावात ठाकूरद्वारी असलेल्या काळाराम मंदिरात.
तिथं विष्णूशास्त्री पणशीकर या विद्वान शास्त्री कुटुंबाचं वास्तव्य होतं. तिथून ते फक्त नाटकाच्या वेडापायी घरातून पळाले. घर सोडल्यापासून त्यांनी प्रचंड कष्ट उपसले. ना धड नीट जेवण, ना राहणं, ना नीट कपडे. असं कष्टदायक जीवन. ते हौशी नाटकं बसवून, त्यात एखादी भूमिका करण्याच्या आपल्या आनंदापायी ते पळाले होते. आनंद मिळत होता. पण ते पूर्णत्व नव्हतं. असे हे कष्ट त्यांनी पाच वर्षे उपसले – आणि एक दिवस त्यांच्या या कष्टदायक धडपडीला, हौशी क्षेत्रात मिळालेल्या थोडय़ाफार नावाला यश मिळालं. पंतांची स्मरणशक्ती जबदरस्त होती. अगदी सर्वच आठवणी तारीखवारांसह सांगायचे. 12 मार्चला (1955) ‘नाटय़ निकेतन’ या मो. ग. रांगणेकर यांच्या संस्थेचे मॅनेजर. दाजी अजगावकर ज्यांच्यासाठी पंतांनी 1954 साली ‘महारथी कर्ण’ हे नाटक दिग्दर्शित केलं होतं. त्यांना पंतांचे गुण माहीत होते. ते रांगणेकरांकडे पंतांना घेऊन गेले. रांगणेकर रत्नपारखी होते. त्यांनी प्रभाकर पणशीकर यांच्याकडे आरपार पाहत नजर रोखून म्हणाले, ‘‘उद्या रविवार 13 मार्च 1955 या दिवशी ‘रॉयल ऑपेरा हाऊस’ येथे माझ्या ‘राणीचा बाग’ड या नाटकाचा प्रयोग सकाळी 9 वाजता आहे. त्यात मला बदली नटाची गरज आहे.’’ म्हणत नाटकाचं पुस्तक त्यांनी पंतांच्या हातात ठेवलं. आणि पुढे म्हणाले, ‘कर्णिक’ या पात्राची भूमिका तुला करायची आहे. तू तुझी नक्कल पाठ करून ये. बाकीचे आपलं काम निभावतील. तुम्ही फक्त तुमची भूमिका सांभाळा.’’ म्हणून उठून गेले.
पंतांनी त्यांची भूमिका चोख वठवली आणि ‘नाटय़ निकेतन’मध्येच पगारी नोकर म्हणून राहिले. त्यात ते व्यवस्थापनाचं पण काम करायचे. नाटक ज्या गावात जायचं त्या गावात बैलगाडी अथवा टांग्यातून भोंगा वाजवत ओरडायचे ‘‘आज रात्री…’’ आणि प्रयोगाआधी तिकीट विक्रीवर बसायचे आणि पहिली घंटा झाल्यावर मेकअप करून असेल त्या नाटय़ निकेतनच्या नाटकात छोटीशी भूमिका करायचे. अशा अनेक भूमिका केल्यावर त्यांना रांगणेकरांनी 1955 साली ‘भैयाला दिली ओसरी’ या नाटकात एक महत्त्वाची भूमिका दिली. कुठं तरी पणशीकर हे नाव ओळखू येऊ लागलं, पण आयुष्याला स्थैर्य लाभलं नाही. पण या कष्टाला, धडपडीला यश मिळायचं होतं. ते रत्नपारखी रांगणेकरांनी त्यांना मिळवून दिलं. ते नाटक होतं ‘तो मी नव्हेच.’
‘तो मी नव्हेच’ हे नाटक खलनायकाचं होतं. तोच नाटकाचा हीरो होता. रांगणेकर चतुर होते. त्यांनी यातली पंचरंगी भूमिका प्रभाकर पणशीकरांना दिली. याचं कारण पंत हे रांगणेकरांना सोडून जाणार नव्हते. कारण त्यांच्याच ‘नाटय़ निकेतन’मध्ये पंत घडले होते. ‘तो मी नव्हेच’मधला लखोबा लोखंडे ही भूमिका कुठल्याही नटाला एका रात्रीत स्टार करणारी होती. आणि स्टार झाला की तो नट ही भूमिका सोडू शकणार नव्हता. म्हणून नेहमी आपला माणूस मुख्य भागी असावा, जो आपल्याला सोडून कुठे जाणार नाही या व्यावहारिक विचाराने रांगणेकरांनी ही पंचरंगी भूमिका पणशीकरांना दिली. लखोबा लोखंडे अनेक स्त्र्ायांना वेगवेगळे वेष पाटलून फसवतो. हे नाटक कुप्रसिद्ध ‘काझी’ केसवर आधारित होतं आणि हे नाटक थोर नाटककार आचार्य अत्रेंनी लिहिलं. नाटक रांगणेकरांच्या हातात देताना अत्रेसाहेब आपल्या भारदस्त आवाजात म्हणाले, ‘‘15 ऑगस्ट 1962 या दिवशी हे नाटक मुहूर्त करेल आणि 8 ऑक्टोबर दसऱयाच्या दिवशी शुभारंभ करेल.’’ सर्व ठरलं. नाटकाच्या तालमी सुरू झाल्या. भूमिका ठरल्या. त्यात लखोबा लोखंडे यांची भूमिका कुठलीही प्रसिद्धी नसलेल्या प्रभाकर पणशीकर या ‘नवख्या’ नटाला रांगणेकर देतायेत म्हणून अत्रेसोहब नाराज झाले होते. पण खरा ‘प्रभाकर सूर्य’ उगवायचा होता. ‘तो मी नव्हेच’ची जाहिरात उत्तम झाली. पंचरंगी भूमिका पंत उत्तम करत होते. झटपट मेकअप, ड्रेस आणि ती संपूर्ण व्यक्तिरेखा पटापट बदलणं हे आव्हान पणशीकरांनी पेलायचं ठरवलं आणि नाटकाचा पहिला प्रयोग मुंबईत न करता दिल्लीत करायचं ठरवलं गेलं. तशी त्या प्रयोगाची तयारी केली.
8 ऑक्टोबर दसरा 1962 चा. नाटकाचा प्रयोग सुरू झाला. लखोबा लोखंडे ऊर्फ हैदरअली ऊर्फ दिवाकर दातार ऊर्फ पॅप्टन अशोक परांजपे ऊर्फ दाजीशास्त्र्ााr दातार आणि राधेश्याम महाराज या पंचरंगी भूमिका त्या पहिल्याच प्रयोगात पंतांनी आपला आत्मा ओतून केल्या आणि इतिहास घडला. अत्रेसाहेब प्रचंड खूश झाले आणि प्रभाकर पणशीकर नावाचा सूर्य नाटय़स़ृष्टीसाठी जीवदान म्हणून उगवला. पण त्या पहिल्याच प्रयोगाच्या रात्री पंत पणशीकर थिएटरच्या बाहेर एका कोपऱयात बसून रडत होते… रडत होते वडिलांच्या, आईच्या, पत्नीच्या, भावंडांच्या आठवणीने, रडत होते-अजूनपर्यंत-सोडलेल्या घरदार, अपमानास्पद जगण्याला आणि अनेक क्लेषदायक आठवणींसाठी रडत होते. एवढय़ात त्यांच्याजवळ आचार्य अत्रे आले आणि म्हणाले, ‘‘अरे वेडय़ा रडतोस काय?’’ म्हणत त्यांनी स्वतः पणशीकरांचे डोळे पुसले. पुढे म्हणाले, ‘‘आजचा दिवस तुझ्या आयुष्यात सोन्याच्या अंधारात लिहिण्यासारखा आहे. चल, म्हणत पंतांना उठवलं आणि ओरडत म्हणाले, ‘‘असा नटाचा अभिनेता झालेला प्रभाकर पणशीकर मागच्या दहा हजार वर्षांत झाला नाही आणि पुढे होणार नाही!’’
एक स्तब्ध शांतता पसरली. भूतकाळातून माझे लाडके पंत प्रभाकर पणशीकर बाहेर आले. तेव्हा त्यांचे डोळे डबडबलेले होते. तरीही ते हसले आणि म्हणाले, ‘‘उद्या तुला माझ्या गुरुवर्य मो. ग. रांगणेकरांचं नाटक ऐकायचं आहे..!’’
मी हसलो आणि समोर बसलेल्या त्या अफाट माणसाकडे , अभिनेत्याकडे, दिग्दर्शक आणि सर्वात मोठय़ा निर्मात्याकडे पाहून आणि माझ्या डोळय़ाने दगा दिला ते नकळत अश्रू ढाळू लागले. अर्थात तो मी नव्हेच. तो एकच होता त्या नाटकाचा, आचार्य अत्रेंचा मानसपुत्र आणि ‘तो मी नव्हेच’चा ब्रॅण्ड अॅम्बेसेडर प्रभाकर पणशीकर ऊर्फ ‘लखोबा लोखंडे’ नटसम्राट प्रभाकर पणशीकर! सलाम पंत तुम्हाला आणि ‘तो मीच आहे’ला! आणि ‘तो मी नव्हेच’ला सुद्धा!



























































