
इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागणे आणि बॅटरी फुटणे या समस्या हल्ली सातत्याने समोर येत आहेत. मात्र आता याच इलेकट्रीक स्कूटरने एका निष्पाप मुलाचा जीव घेतला आहे. ई-स्कूटर चार्ज होत असताना झालेल्या स्फोटात 7 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना वसई येथे घडली आहे. रविवारी अचानक झालेल्या या स्फोटामुळे जखमी झालेल्या या मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र रुग्णालयात त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी पालघरमधील वसई परिसरात ही घटना घडली. शब्बीर शाहनवाज असे या मृत मुलाचे नाव असून माणिकपूर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
ई-स्कूटरमध्ये स्फोट होणे किंवा आग लागणे ही आता सामान्य गोष्ट झाली आहे. यामागचे मुख्य कारण म्हणजे त्याची बॅटरी. कंपन्या 90 टक्के ई-स्कूटरमध्ये लिथियम-आयन बॅटरी वापरतात. बॅटरी चार्जिंग दरम्यान हे लिथियमचे कण गरम होतात आणि आग पकडतात. बॅटरीमधला स्फोट कधी कधी हँडग्रेनेडच्या तीव्रते एवढा मोठा होतो. यामध्ये अनेक जण जखमी होतात तर काहींना आपला जीव देखील गमवावा लागतो.


























































