पदासाठी कोणापुढे पदर पसरणार नाही, पंकजा मुंडे यांचा भगवान गडावर निर्धार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मी कोणासमोरही झुकणार नाही. कोणाचे जोडे उचलणाऱ्यांचे कधीच इतिहासात नाव झालेले नाही. माझ्या अंगात हिंदवी स्वराज्याचं स्वप्न बघणाऱ्या छत्रपती शिवरायांचे संस्कार, भगवान बाबा आणि गोपीनाथ मुंडे यांचे रक्त आहे. मी संघर्षाला घाबरत नाही. मी थकणार नाही, कधीही कुणासमोर झुकणार नाही पदासाठी कोणापुढे पदर पसरणार नाही, अशा शब्दांत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी आज भविष्यातील वाटचालींचे संकेत दिले.

पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट येथे श्री संत भगवानबाबा यांची जन्मभूमी असलेल्या ठिकाणी दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात त्यांनी पक्षातील संघर्ष, 2024च्या निवडणुका अशा विविध विषयांवर भाष्य केले.

नाराजीवर भाष्य करताना त्या म्हणाल्या की. माझ्या नाराजीची चर्चा बंद करा, कोणीही नाराज नाही. तुम्ही कुणाचाही अवहेलना करू नका, कोणाचा अपमान करू नका अशी माझी इच्छा आहे. इतके दिवस मी कधीच या विषयावर बोलले नाही. कारण माझा तसा स्वभाव नाही. यावर मौन बाळगले. मी मंत्री असताना मोनिका राजळे आणि इतरांना हाताने वाढून जेऊ घालत होते. मला गर्व नाही, तर मला अभिमान आहे. माझ्या लेखी हा विषय संपला आहे. ज्यांना मंत्री करायचे त्यांना ते करतील. पण आपण 2024 च्या निवडणुकीच्या तयारीला लागले पाहिजे, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
यावेळी त्यांनी शेरोशायरीतून अनेकांना कोपरखळ्या मारल्या. ‘हकीगत को तलाश करना पडता है, अफवांए तो घर बैठे मिल जाती है’ हे सत्य आहे. माझ्याकडे तुम्हाला बसवण्यासाठी खुर्च्या नाहीत. खुर्च्या असत्या तर मैदान पुरले नसते. संघर्ष तर सर्वांनाच करावा लागतो, पण संघर्ष करणाऱ्यांची इतिहासात नोंद होते. जोडे उचलणाऱ्यांची इतिहासात नोंद होत नाही असे सांगताना त्यांनी ‘जरुरत से जादा इमानदार हूँ मै, इसलिये सबके नजरो मे गुन्हेगार हूँ मै.’ ज्योतीतून यज्ञ व थेंबातून समुद्र कसा बनतो हे दाखवून देऊ, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. या मेळाव्याला खासदार डॉ. प्रीतम मुंडे, सुजय विखे, महादेव जानकर, आमदार सुरेश धस, मेघना बोर्डीकर व अन्य उपस्थित होते.

तिकीट मागणार नाही
2024 मध्ये विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाने परळी मतदारसंघात तिकीट दिले तर तयारीला लागणार आहे. मला कोणत्याही नेत्याबद्दल काही बोलायचे नाही. मी कोणासमोर पदर पसरून काही मागणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले.