‘वंदे भारत’ची दुसऱ्या दिवशीही गुराला धडक, गाडीचे नाक चेपले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई सेंट्रल ते गांधी नगर धावणाऱ्या सेमी हायस्पीड वंदे भारत एक्सप्रेसने सलग दुसऱ्या दिवशी गुराला धडक दिली आहे. मुंबईकडे येताना पंजारी आणि आणंद स्थानकांदरम्यान दुपारी तीनच्या सुमारास हा प्रकार घडला. या वेळी गाडीच्या ड्रायव्हरच्या केबिनच्या बाहेरील एअरोडायनामिक कोनला ‘डेंट’ आला आहे. गाडी दहा मिनिटे थांबून नंतर पुढील प्रवासाला रवाना करण्यात आली. गाडीचे काहीही नुकसान झाले नसले तरी वारंवार होणाऱ्या अशा घटनांमुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

सेमी हायस्पीड ‘वंदे भारत’ एक्सप्रेसचे एअरोडायनामिक ‘नाक’ काल गांधीनगरला जाताना अहमदाबादजवळ म्हशींच्या कळपाशी झालेल्या जोरदार टक्करीमुळे निखळले होते. मुंबई सेंट्रल येथील कोच केअर सेंटरमध्ये काल मध्यरात्री या दुर्घटनाग्रस्त गाडीची डागडुजी करून आज शुक्रवारी सकाळी ही गाडी पुढच्या प्रवासाला रवाना झाली. परंतु शुक्रवारी दुपारी 3.44 वा. मुंबईला येताना पुन्हा या ट्रेनला आणंदजवळ एका गुराची धडक बसल्याने तिचे फायबरचे नाक थोडे चेपले. पश्चिम रेल्वेने गुरांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी संपूर्ण मार्गावर तारांचे पुंपण घालून अटकाव करण्याची योजना कालच जाहीर केली होती.

‘सुरक्षा कवच’ यंत्रणा गुरांसमोर निष्प्रभ

दिल्ली ते वाराणसी सुरू केलेल्या पहिल्या ‘वंदे भारत’ एक्सप्रेसलाही गुरांचा त्रास निर्माण झाला होता. आता मुंबई सेंट्रल ते गांधीनगर सुरू केलेल्या तिसऱ्या वंदे भारतच्या ट्रायलच्या दिवशीच या गाडीची गुरांशी भीषण टक्कर झाली होती. विशेष म्हणजे, या गाडीला टक्करविरोधी यंत्रणा बसविली असून ती केवळ एका रूळांवर दोन ट्रेन आल्या किंवा लाल सिग्नल ओलांडला तरच कार्यरत होत असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. रेल्वे ट्रकवर गुरे येण्यापासून रोखण्यासाठी मात्र पुंपण किंवा संरक्षक भिंती उभारण्याचाच पारंपरिक उपाय असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

म्हणून बुलेट ट्रेन एलिव्हेटेड

मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन सुरुवातीचे बीकेसीतील टर्मिनलचे भुयारी स्थानक वगळता संपूर्ण मार्ग एलिव्हेटेड (उन्नत) स्वरूपाचा  आहे. शेतकरी तसेच जनावरांचे चलनवलन या सर्वांचा विचार करून बुलेट ट्रेन प्रकल्प एलिव्हेटेड स्वरूपात बांधला आहे. जपानची बुलेट जमिनीवरून धावते. चीननेदेखील आधी जमिनीवर धावणारी बुलेट ट्रेन बांधली होती, नंतर त्यांनी ती एलिव्हेटेड केली.

म्हशींच्या मालकाविरोधात ट्रेस पासिंगचा गुन्हा

वंदे भारतने गुरुवारी तीन म्हशींना उडविल्याच्या प्रकरणात म्हशींच्या अज्ञात मालकाविरोधात गुजरात आरपीएफने रेल्वे कायदा 1989 कलम 147 नुसार रेल्वे हद्दीत बेकायदेशीर प्रवेश केल्या प्रकरणी ट्रेस पासिंगचा गुन्हा दाखल केला आहे.