गद्दारांना गाडण्यासाठी शिवसेनेचे जुने मावळे सज्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठी माणसांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारी शिवसेना. हिंदू अस्मिता जपणारी शिवसेना. प्रत्येक मराठी माणसाला जिवाभावाची वाटणारी शिवसेना. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेसाठी अनेकांनी त्याग केला. शिवसेनेच्या स्थापनेपासून कार्य करणारे अनेक शिवसैनिक आजही निष्ठsने संघटनेचे काम करत आहेत. या ज्येष्ठ शिवसैनिकांसाठी शिवसेना भवनामध्ये सुसज्ज असे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. रोज अनेक शिवसैनिक त्या कार्यालयात आवर्जून हजेरी लावतात. जुन्या आठवणींना उजाळा देण्याबरोबरच शिवसेनेशी गद्दारी केलेल्या गद्दारांना गाडणारच, असा निर्धार त्यांनी केला आहे.

बाळासाहेबांनी मराठी माणसांसाठी शिवसेनेची स्थापना केली. त्या शिवसेनेच्या आणि शिवसैनिकांच्या बळावर मोठे झालेले गद्दारी करून गेले. त्यांना धडा शिकवण्याचा निर्धार शिवसेनेच्या या जुन्या निष्ठावंत मावळय़ांनी केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून शिवसेना भवनाच्या तळमजल्यावर ज्येष्ठ शिवसैनिकांसाठी सुसज्ज असे वातानुकूलित कार्यालय विजयादशमीच्या मुहूर्तावर सुरू करण्यात आले. रोज सायंकाळी तिथे ज्येष्ठ शिवसैनिक येतात. मुंबईच्या कानाकोपऱ्यातून आणि अगदी डोंबिवली, बदलापूर येथूनही शिवसैनिक येतात. त्यात 1966 पासून बाळासाहेबांसोबत काम केलेल्या बुवा खताते, दिना सावंत, चिखलीकर आदी ज्येष्ठ शिवसैनिकांचा समावेश असतो, अशी माहिती शिवसेना सचिव विनायक राऊत यांनी दिली.

ज्येष्ठ शिवसैनिक म्हणजे शिवसेनेचा खजिना. त्यांच्याच बळावर शिवसेना मोठी झाली आणि विस्तारली. कठीण प्रसंगांमध्ये हेच शिवसैनिक बाळासाहेबांसोबत पहाडासारखे उभे राहिले. आताही संकटाच्या काळात या शिवसैनिकांकडून संघटनेला बळ दिले जात आहे. ज्येष्ठ शिवसैनिकांच्या कार्यालयात येणारे शिवसैनिक आपल्या अनुभवाची शिदोरी नव्या कार्यकर्त्यांना देतात. कितीही कठीण प्रसंग असो, बाळासाहेबांचा आदेश आला की त्याप्रमाणे काम फत्ते करायचेच असा निर्धार करूनच आम्ही मैदानात उतरायचो. असे त्यांचे अनुभव ऐकले की अंगावर शहारे येतात. या ज्येष्ठ शिवसैनिकांचे अनुभव त्यांच्याकडूनच ऐकावे आणि नव्या कार्यकर्त्यांनी नवचैतन्य घ्यावे असे राऊत यांनी सांगितले.