
केंद्रीय निवडणूक आयोगाने हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे ही निवडणूक एकाच टप्प्यात होणार आहे. 12 नोव्हेंबर 2022 रोजी मतदान असून 8 डिसेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने एका पत्रकार परिषदेत शुक्रवारी निवडणुकांची घोषणा केली.
हिमाचलमध्ये यापूर्वीची निवडणूक 2017 साली झाली होती. त्या निवडणुकीत भाजप विजयी झाल्याने या राज्यात सध्या भाजप सत्ताधारी आहे. भाजपचा कार्यकाळ 8 जानेवारी 2023 रोजी संपणार आहे. हिमाचल विधानसभेच्या 68 जागांसाठी मतदान होणार आहे. गेल्या निवडणुकीप्रमाणेच यावेळीही एकाच टप्प्यात मतदान होणार आहे.
Assembly polling in #HimachalPradesh to be held on 12th November; Counting of votes to be held on 8th December pic.twitter.com/t4y3Hsx9xi
— ANI (@ANI) October 14, 2022
2017मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 44 जागांवर विजय मिळवला होता. काँग्रेसला 21 जागांवर विजय मिळाला होता तर दोन जागांवर अपक्ष उमेदवार निवडून आले होते. एका जागेवर सीपीआय एमचा उमेदवार निवडून आला होता. सध्या हिमाचल प्रदेशमध्ये 53 लाख 76 हजार 77 नोंदणीकृत मतदार आहेत. मागील निवडणुकीत 75.28 टक्के लोकांनी मतदान केलं होतं.



























































