स्पाइसजेटच्या विमानांचे इंजिनऑइल दर 15 दिवसांनी तपासणार, वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे DGCA चा निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

स्पाइसजेट एअरलाइन्सच्या विमानांना वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) कंपनीला कठोर निर्देश जारी केले आहेत. या नव्या सूचनांनुसार, स्पाइसजेट एअरलाइन कंपनीला दर 15 दिवसांनी इंजिन उत्पादक कंपनी प्रॅट अँड व्हिटनीला इंजिनमध्ये वापरलेल्या तेलाचे नमुने पाठवावे लागणार आहेत. तसेच डीजीसीएने स्पाईसजेटला एका आठवड्याच्या आत सर्व विमानांच्या इंजिनांची एकदा बोरोस्कोपिक तपासणी करण्यास सांगितले आहे. नुकतेच गोव्याहून हैदराबादला जाणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानाच्या केबिनमध्ये धूर दिसल्यानंतर बुधवारी रात्री हैदराबाद विमानतळावर त्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले होते. DGCA ने स्पाईसजेटच्या 50% फ्लाइट्सवर आधीच बंदी घातली आहे.

DGCA हैद्राबादच्या घटनेची चौकशी करत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. डीजीसीएच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, विमान विमानतळावर सुरक्षितपणे उतरल्यानंतर प्रवाशांना आपत्कालीन एक्झिट गेटमधून बाहेर काढण्यात आले होते. यादरम्यान एका प्रवाशाच्या पायाला किरकोळ दुखापत झाली. Q400 VT-SQB या फ्लाइटमध्ये सुमारे 86 प्रवासी होते. या विमानाच्या आपत्कालीन लँडिंगमुळे बुधवारी नऊ उड्डाणे वळवावी लागली. ही घटना रात्री अकराच्या सुमारास घडली. या घटनेची चौकशी सुरु आहे.