
गेल्या दशकभरात मुंबईत बलात्काराच्या घटनांमध्ये सुमारे 235 टक्के वाढ झाली आहे. तर विनयभंगाचं प्रमाण 172 टक्क्यांनी वाढलं आहे. प्रजा फाउंडेशनने 2012 ते 2021 या दशकभरातील गुन्ह्यांच्या सर्वेक्षणातून ही टक्केवारी उघड झाली आहे.
या अहवालात गुन्ह्यांचं स्वरूप, त्याचं प्रमाण, बळींचं वय इत्यादींची देखील तपशीलवार माहिती देण्यात आली आहे. मुंबईत गेल्या दशकभरात विविध गुन्ह्यांचा आढावा या अहवालात घेण्यात आला आहे. त्यात बलात्कार, विनयभंग, खून, अपहरण, धमकी देणे इत्यादींचा समावेश आहे.
या यादीत गेल्या दशकभरात बलात्काराचे गुन्हे नोंदवण्याचं प्रमाण 235 टक्क्यांनी वाढलं आहे. तर विनयभंगाच्या प्रकरणांमध्ये 172 टक्क्यांची वाढ झाली आहे. अपहरणाच्या प्रकरणात 650 टक्के इतकी गंभीर वाढ दिसून येत आहे. अपहृत बळींमध्ये 16 ते 18 वर्षं वयोगटातील 98 टक्के मुलांचा समावेश आहे. तर अल्पवयीन मुलींच्या पळून जाण्याची प्रकरणं देखील अपहरणाच्या आरोपाखाली नोंदवण्यात येत आहेत.
गेल्या दशकात खुनाचं आणि चोरीचं प्रमाण अनुक्रमे 27 टक्के आणि 16 टक्क्यांनी घसरलं आहे. या वाढीव टक्केवारीच्या मागे अशा गुन्ह्यांप्रति नागरिकांमध्ये आलेली सजगताही कारणीभूत आहे, असं प्रजा फाऊंडेशनचं म्हणणं आहे.





























































