लेख – परतीच्या पावसाने ‘पीकपाणी’ संकटात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> श्रीकांत देवळे

यंदा मान्सूनचे आगमन उशिरा झाले असले तरी जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यात पावसाने सर्वदूर हजेरी लावत दमदार बरसात केली. पूर्ण मान्सूनच्या चार महिन्यांत धुवांधार पावसाचे प्रमाण अधिक राहिल्याने शेतीला याचा मोठा फटका बसला. आता परतीच्या प्रवासाला निघालेल्या मान्सूनने तर खान्देशपासून पश्चिम महाराष्ट्रापर्यंत आणि कोकणपासून विदर्भापर्यंत सपाटा लावला असून सोयाबीन, कपाशी, तूर, उडीद आदी सर्व पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याची भरपाई मिळण्यासाठी ‘ई-पीकपाहणी’ नावाची नवीन व्यवस्था शेतकऱ्यांच्या माथी मारली आहे. त्याच्या मर्यादा लक्षात घेता प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करणे गरजेचे आहे.

जून ते सप्टेंबर या काळात पडणारा पाऊस हा संपूर्ण वर्षाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवत असतो. वेळेत येणारा पाऊस, पावसाची हजेरी ही संपूर्ण वर्षभरासाठीच्या अनेक प्रकारच्या कामांसाठीची शिदोरी असते. अन्नधान्य उत्पादन आणि महत्त्वाचे म्हणजे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न यावर विसंबून असतो. पाऊस जर पुरेसा आणि योग्य वेळी बरसला नाही, तर पाण्याचे भीषण संकट निर्माण होते. मान्सूनचे असमान वितरण ही आज देशापुढील प्रमुख समस्या बनली आहे. पावसाची सरासरी  ही मान्सूनचा चांगला फायदा झाला हे दर्शविण्यासाठी पुरेशी नसून पावसाचे वितरण कसे झाले हा घटकही अधिक महत्त्वाचा ठरतो. अलीकडील काळात कमी वेळेत जास्त पाऊस पडणे हे मान्सूनचे जणू व्यवच्छेदक लक्षण बनल्याचे दिसत आहे. धरणांमधील पाणीसाठा वाढण्यासाठी पाणलोट क्षेत्रामध्ये असा पाऊस झाल्यास तो उपकारकच ठरतो; परंतु शेतीसाठी असा पाऊस नुकसान करणारा ठरतो. यंदाच्या पावसाळ्यात याची अनेकदा प्रचीती आली आहे. जून ते सप्टेंबर या काळात राज्यात यंदा पर्जन्यमान चांगले झाले; परंतु अनेक भागांमध्ये पावसाची बरसात ही धुवांधार स्वरूपाची राहिली. त्यामुळे शहरी भागांमध्ये गटारे तुंबणे, झाडे पडणे, पाणी साचणे यांसारख्या समस्यांमुळे नागरी जीवन त्रस्त झाले; तर ग्रामीण भागामध्ये शेती क्षेत्रालाही याचा फटका बसला. अनेक ठिकाणी पिकांची नासधूस झाली. पाऊस हा असाच असतो. लहरीपणा हा त्याचा स्वभावधर्म आहे; परंतु अलीकडील काळात तो पराकोटीला गेला आहे. त्यातील बेभरवशीपणा वाढला आहे. त्यामुळे हवामान खात्यालाही पावसाचे अंदाज बांधणे कठीण होत आहे.

जून महिन्यामध्ये सर्वांना सुखावणारे वातावरण निर्माण करत आलेला मान्सूनराजा साधारणतः सप्टेंबर महिन्यात परतीच्या प्रवासाला निघतो. राजस्थानमधून 17 सप्टेंबरनंतर मान्सूनचा माघारीचा प्रवास सुरू होतो. महाराष्ट्रात सर्वसाधारणपणे 5 ऑक्टोबरपर्यंत परतीचा पाऊस दाखल होतो. यंदा नेहमीपेक्षा उशिरा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. या पावसाने पश्चिम महाराष्ट्र, खान्देश आणि विदर्भाला जोरदार तडाखा दिला आहे.  कोकणातही परतीच्या पावसाने दाणादाण उडवून दिली आहे.

विदर्भाचा विचार करता यंदाच्या मान्सूनमध्ये सर्वाधिक बाधित क्षेत्र विदर्भामध्ये आहे. यंदाच्या हंगामात तब्बल 84 महसूल मंडळात अतिवृष्टी झालेली आहे. विदर्भातील जवळपास सर्वच तालुक्यांत पावसाने सरासरीपेक्षा अधिक बरसात केली आहे. अनेक भागांना अतिवृष्टीचा तडाखाही बसला आहे. त्यामुळे जवळपास  दोन लाख हेक्टरमधील सोयाबीनचे  नुकसान झालेले आहे. तशातच गेल्या काही दिवसांपासून परतीचा पाऊस बरसू लागल्यामुळे  काढणीच्या हंगामात सोयाबीन मातीमोल होत आहे. शेतकऱ्यांनी सोंगणी करून लावलेल्या सोयाबीनच्या गंजींमध्ये पाणी शिरल्याने हे पीक सडू लागले आहे. दुसरीकडे सततच्या ओलाव्यामुळे सोयाबीनच्या शेंगामधून बीजांकुर फुटत आहे. पावसामुळे सोयाबीनची प्रतवारी कमी झाल्याचा फायदा व्यापारी घेत आहेत. साधारणतः महिनाभरापूर्वी 5 ते 6 हजारांपर्यंत असलेला सोयाबीनचा भाव आता चार हजारांवर आलेला आहे. तुरीसारख्या पिकाला जास्त पाण्याची गरज भासत नाही, परंतु सततच्या पावसामुळे तूर लागवड झालेल्या अनेक भागांतील शेतीत पाणी साचून राहिल्याने तुरीवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होताना दिसत आहे.

वास्तविक, तुरीला यंदा चांगला भाव आहे; परंतु पावसामुळे पिकाचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सततच्या पावसाने कपाशीच्या बोंडावरही बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे.   पश्चिम महाराष्ट्रामध्ये परतीच्या पावसाचा तडाखा द्राक्षबागांना बसला आहे. भातपिके, ऊस, मकाही पावसाने झुकून गेली आहेत. एकंदरीतच परतीच्या पावसामुळे कपाशी, सोयाबीन, उडीद, तूर, संत्रा आदी पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी त्यामुळे चिंताक्रांत झाला आहे. पावसामुळे झालेल्या चिखलामुळे हरभऱ्यासाठी शेती तयार करण्यातही अडचणी निर्माण होत आहेत. कांदा लागवडीबाबतही तीच अडचण झाली आहे. शहरी भागातही या पावसामुळे व्यवसायावर परिणाम झाला आहे. सणासुदीचे दिवस असूनही बाजारपेठेत पाहिजे तशी गर्दी दिसून येत नाही. अन्नधान्याच्या पिकांबरोबरच परतीच्या पावसामुळे भाजीपाल्याची पिकेही पाण्यात गेल्यामुळे बाजारात भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. परिणामी, सर्वसामान्यांच्या खिशावर मोठा भार पडत आहे.

अशा प्रकारच्या अडचणींच्या काळात नियोजन किंवा व्यवस्थापन या गोष्टींवर लक्ष देणे आवश्यक आहे.  नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तातडीने मदत मिळणे गरजेचे आहे. मदतीसाठी आधी पंचनामे व्हावे लागतील, परंतु यासाठी होणारी दिरंगाई आणि त्यातील नियमांची क्लिष्टता यामुळे प्रत्यक्ष मदत मिळेपर्यंत बराच उशीर होतो. दरवर्षी पंचनाम्यांचा घोळ शेतकऱ्यांना मेटाकुटीला आणणारा ठरतो. यंदाच्या वर्षी यामध्ये ‘ई-पीकपाहणी’ची भर पडली आहे. राज्य सरकारने ढोलताशे वाजवत हे ऍप विकसित करून शेतकऱ्यांसाठी खूप काहीतरी केल्याचा आभास निर्माण केला, परंतु या ऍपमुळे यंदा शेतकऱ्यांची मोठी अडचण होणार आहे. कारण हे ऍप वापरण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याकडे अँड्रॉईड मोबाईल असणे गरजेचे आहे. तसेच शेताच्या बांधावर इंटरनेट कनेक्टिव्हिटी असणे आवश्यक आहे. आज राज्याच्या बहुतांश भागात मोबाईलवर इंटरनेटला रेंज नसण्याची समस्या जाणवते. दुसरीकडे ग्रामीण भागात मोबाईल सेवेचा प्रसार झालेला असला तरी बहुतांश शेतकऱ्यांकडे आजही अँड्रॉईड स्मार्टफोन नाहीत. त्यामुळेच यंदा खरीप हंगाम संपायला आला तरी पीकपाहणीला मिळालेला प्रतिसाद अत्यल्प आहे, परंतु याचाही फटका पुन्हा शेतकऱ्यांनाच बसणार आहे. कारण ई-पीकपाहणी झालेली नसल्यास शेतकऱ्यांच्या सातबारावर नोंदच होणार नाही. तसे झाल्यास शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळणार तरी कशी? ते पीक विम्यासाठीचा दावा कसे करू शकणार? म्हणूनच शेतकऱ्यांनी पूर्वीप्रमाणे तलाठय़ांकडून पंचनामे करून घ्यावेत अशी मागणी केली आहे. तसेच कृषी विभागाकडून केलेले पंचनामे ग्राह्य धरुन पीक विमा कंपन्यांना दावे मंजूर करायला सांगावे, अशी मागणी केली आहे. याचा शासन कितपत गांभीर्याने विचार करते हे पाहावे लागेल.