
नावीन्याचा ध्यास घेऊन वेगवेगळे प्रयोग करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या मराठी सिनेसृष्टीत धडाकेबाज अॅक्शनपटाची भर पडणार आहे. मराठमोळा ‘सूर्या’ अखेरच्या क्षणापर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘सूर्या’ मराठी चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच समोर आला आहे. येत्या 6 जानेवारी रोजी हा चित्रपट राज्यभरात प्रदर्शित होणार आहे.
हसनैन हैदराबादवाला यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘सूर्या’मधून प्रसाद मंगेश हा उदयोन्मुख अभिनेता अॅक्शन हीरो म्हणून झळकणार आहे. याबद्दल प्रसाद मंगेश म्हणाला की, ‘सूर्या’च्या रूपात नायक बनून प्रेक्षकांसमोर येत असल्याचा आनंद आहे. पदार्पणातच अॅक्शनपॅक्ड चित्रपटात काम करण्याची संधी मिळाल्याने मराठी सिनेसृष्टीत दमदार एंट्री घेत आहे. हीच खऱया अर्थाने आनंद आणि समाधानाची गोष्ट आहे. चित्रपटात प्रसाद मंगेशसोबत अखिलेंद्र मिश्रा, हेमंत बिर्जे, उदय टिकेकर, पंकज विष्णू, अरुण नलावडे, गणेश यादव, संजीवनी जाधव, रुचिता जाधव, देवशी खांधुरी, हॅरी जोश, राघवेंद्र कडकोळ आदींच्या भूमिका आहेत. लेखक मंगेश ठाणगे यांच्या ‘सूर्या’च्या कथेवर मंगेश ठाणगे यांनी विजय कदम यांच्या साथीने पटकथा लिहिली आहे.
























































