फर्स्ट टेक – अभिनयाशी 36 गुण जुळले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> स्वरा सावंत

एक हरहुन्नरी कलाकार म्हणून ओळख असलेला हा अभिनेता, मराठी सिनेसृष्टीत तसा नावाजलेलाच. अनेक वर्षे इंडस्ट्रीत काम करून झाली, पण नाव मिळाल्यानंतर ते टिकवून ठेवण्यासाठीचा स्ट्रगल काही वेगळाच. तरीही सुरुवातीचा स्ट्रगल खूप काही शिकवून जातो आणि आयुष्यभर लक्षात राहतो, यासाठी अभिनयाशी 36 गुण जुळले पाहिजेत…आपला अनुभव सांगतोय अभिनेता संतोष जुवेकर.

मी अस्सल ठाणेकर. त्यामुळे करीअरसाठी आपलं घर, शहर सोडून यायची वेळ माझ्यावर नाही आली. पण हो, सुरुवातीला केलेली धडपड आजही जशीच्या तशी मनावर कोरलेली आहे. अभिनेता व्हायचं ठरलं आणि मग त्या वाटेवर जे काम मिळेल ते करण्याची तयारीही केली. सर्वसामान्य घरातून आलेला मी. या विश्वात कोणताही गॉडफादर नाही. मग काय, आपलं नाणं खणखणीत करायचं ठरवलं. थिएटरशी नाळ जोडली गेली. सहकलाकारांकडून शिकत गेलो. शेवटी अनेक माध्यमं अजमावून बघताना पॅमेरा फेस करायची वेळ आलीच.
पहिली सीरियल ‘दामिनी.’ आजही आठवतंय, पोलीस इन्स्पेक्टरचा रोल मी केला होता. गांगरणे, चुकणे, दिग्दर्शकाचे पडणारे ओरडे पर्यायाने येत होते. पण म्हणतात ना, पाण्यात पडल्याशिवाय पोहता येत नाही. ओएस, पॉइंट व्हय़ू, टू शॉट, थ्री शॉट काय ते कळलं. याबरोबरच पासिंग, छोटे पॅरेक्टर, ज्युनिअर, कॉस्च्युम, मेकअप अशी सगळी कामे करत होतो. पण ‘दामिनी’चा पहिला रोल करताना झालेला गोंधळ आजच्या यशासाठी कारणीभूत ठरला.

सुरुवात महत्त्वाची असते
कोणत्याही क्षेत्रात करीअर करायचंय असं ठरलं की सगळं होतं असं नाही. प्रत्येक गोष्टीची सुरुवात महत्त्वाची असते. ती झाली की गाडी सुसाट पळते. म्हणून नवीन कलाकारांनी सुरुवात दमदार जीव ओतून करावी… इतकंच.

लग्नाची बदलती व्याख्या
लॉक डाऊननंतर लग्न-संसार कुटुंबाची बदलती व्याख्या अधोरेखित करणारा विषय घेऊन ‘36 गुण’ हा सिनेमा येत्या 4 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ठरवून लग्न करताना घरची मंडळी आवर्जून पत्रिका बघतात. यामध्ये कुटुंब खूश होतं, पण ज्यांचे लग्न लावून दिलंय त्यांचं काय…लग्नानंतर सुरू होणारा मानसिक प्रवास या सिनेमात दाखवला आहे. सध्या लॉक डाऊननंतर कोलमडलेली लग्नव्यवस्था, दुभंगलेल्या नात्यांवर भाष्य, आपण आपल्यालाच एखादी संधी द्यावी का, याची दुसरी छटा उलगडण्याचा प्रयत्न नव्याने या लव्ह स्टोरीमध्ये केल्याचे संतोष सांगतो.

घरातून विरोध, तरीही…
माझे बाबा रिक्षाचालक आणि आई गृहिणी. एका सामान्य कुटुंबातील मी काही वेगळं स्वप्न पाहत होतो. घरातून अर्थात पाठिंबा नव्हताच, कारण आपल्या पालकांना नेहमीच आपलं मूल नीट शिकावं, लग्नसंसार, कुटुंब सांभाळणारा असावा असं वाटतं. पण पाहिलं काम पाहिलं आणि मी खरंच चांगल्या वाटेवरून जात असल्याची खात्री त्यांना पटली.