तंत्रज्ञानापेक्षा मानवाची जडणघडण महत्त्वाची! मराठी यशवंत पुरस्कारावेळी अनिल काकोडकर यांनी व्यक्त केले मत  

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तंत्रज्ञानात चांगले किंवा वाईट असे काही नसते. तंत्रज्ञान फक्त तुम्हाला अधिक शक्ती देते. या शक्तीचा वापर कसा करायचा ते मानवाच्या विचार करण्याच्या पद्धतीवर अवलंबून आहे. नवीन युगाला तोंड देण्यासाठी वैज्ञानिक किंवा तंत्रज्ञानाच्या प्रगतीपेक्षा मानवाची जडणघडण महत्त्वाची आहे, असे मत ज्येष्ठ संशोधक डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केले.

मुंबई मराठी साहित्य संघाच्या 87 व्या वर्धापन दिनानिमित्त डॉ. काकोडकर यांना संघाच्या अध्यक्षा अचला जोशी यांच्या हस्ते मराठी यशवंत पुरस्कार देऊन गौरवण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी संघाच्या इतर सेवा पुरस्कारांचे डॉ. काकोडकर यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. शुभदा पिंगे यांना सहचारिणी पुरस्कार, सुचिता घोरपडे यांना ग्रामीण कथेसाठी चंद्रगिरी पुरस्कार, बालसाहित्यासाठी रमेश तांबे, कथाकार शांताराम पुरस्कार माधव सावरगावकर यांना तर वैचारिक साहित्यासाठी डॉ. सतीश बागल यांना पुरस्कार देण्यात आला. वि. पु. भागवत पुरस्कार दत्ता डांगे, पै. के. नारायण काळे स्मृती पुरस्कार चंद्रकांत कुलकर्णी, माधव ज्युलियन पुरस्कार दत्ताराम गायकर तर दिगंबर परुळेकर स्मृती पुरस्कार विद्याधर ताठे यांना देण्यात आला. यावेळी डॉ. काकोडकर यांच्या हस्ते साहित्य दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. साहित्य शाखेचे कार्यवाह अशोक बेंडखळे आणि कार्याध्यक्ष प्रा. उषा तांबे यांनी संस्थेच्या वाटचालीची माहिती दिली.