वेंगसरकर अकादमीचा 456 धावांचा डोंगर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रोहन करंदीकरच्या (नाबाद 200) आणि हर्ष आघाव (नाबाद 176) यांनी तिसऱया विकेटसाठी केलेल्या 348 धावांच्या भागीदारीमुळे दिलीप वेंगसरकर अकादमीने पय्याडे स्पोर्ट्स क्लबविरुद्ध 3 बाद 456 धावांचा डोंगर रचला. दहाव्या संतोष कुमार घोष क्रिकेट स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीतल्या एका अन्य सामन्यात गे कॅव्हेलियर्सचा डावखुरा फिरकी गोलंदाज कार्तिकेय शर्मा याने स्पोर्ट्सफिल्ड क्रिकेट क्लबविरुद्ध 51 धावांत 6 बळी घेत आपली छाप पाडली. ही स्पर्धा स्पोर्टिग युनियन आणि कल्याणदास मेमोरियल फाऊंडेशनने आयोजित केली आहे. मुंबई क्रिकेटचे आजी–माजी सचिव अजिंक्य नाईक आणि संजीव नाईक यांचे स्पर्धेला सहाय्य लाभले आहे.

दिलीप वेंगसरकर अकादमीचा नाणेफेकीनंतर फलंदाजी करण्याचा निर्णय एकदम अचूक ठरला. रोहन आणि हर्ष हे संघाची 2 बाद 51 अशी स्थिती असताना एकत्र आल्यावर त्यानंतर त्यांनी प्रतिस्पर्धी संघाला अक्षरशः पळताभुई थोडी केली. रोहनने 187 चेंडूंत 32 चौकारांच्या सहाय्याने आपले द्विशतक पूर्ण केले. त्यामानाने हर्षची खेळी म्हणजे समोरच्या गोलंदाजांचा संहार अशी होती. केवळ 132 चेंडूंमध्ये त्याने 17 चौकार आणि पाच षटकार लगावत आपली 176 धावांची साकारली. पय्याडे संघाने संथ गोलंदाजी केल्याने त्यांना 40 धावांची पेनल्टी पंचांनी दिली.