व्यथा बालनाटय़ाची

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> संजय कुळकर्णी

रंगभूमीवर सादर झालेल्या बालनाटय़ांनी बाल प्रेक्षकांना एक दिशा दिली. मनोरंजनाबरोबर बाल मनावर कळत नकळत संस्कार होत गेले. दोन वर्षांच्या लॉकडाऊनच्या काळात बालनाटय़ांचे नुकसान झाले. प्रेक्षकांना बालनाटय़ांपासून वंचित व्हावं लागलं. यंदाच्या वर्षी दररोज प्रयोग होताना दिसताहेत.

सुट्टी पडली की, बालनाटय़ांचा सुकाळ असतो. यंदाच्या दिवाळी सुट्टीत सॉलिड बालनाटय़ांचे पीक आलेले आहे. पेपर उघडला तर व्यावसायिक नाटकांबरोबर बालनाटय़ांच्या जाहिराती दिसतात. याचा अर्थ एकच की, बालनाटय़ांना प्रेक्षक आहेत. बाल रंगभूमी तशी दुर्लक्षित आहे, असं काहीजण परिसंवादात बोलताना यापूर्वी दिसलेत, पण ते मानायला मी तयार नाही. कारण त्या रंगभूमीने व्यावसायिक रंगभूमीला नाटककार, दिग्दर्शक आणि कलाकार दिलेत. सुधा करमरकर, रत्नाकर मतकरी, कांचन सोनटक्के आणि रामनाथ थरवळ यांनी बालरंगभूमी समृद्ध केली.

कॉर्पोरेट ‘अलबत्या गलबत्या’ बालनाटय़ तुफान गर्दीत सुरू आहे. कॉर्पोरेट बालनाटय़ हे विशेषण बालनाटय़ सादर करणाऱ्या मंडळींनी दिलेले आहे. बालनाटय़ाची अनेक वर्षे निर्मिती करणारे आणि सातत्यानं नवनवीन देणारे राजू तुलालवार म्हणाले, बुकिंगची रेंज कमी झालेली आहे. त्याची दोन कारणं आहेत. कॉर्पोरेट बालनाटय़ अलबत्या गलबत्या या बालनाटय़ाने तिकीट दर 400 रुपये ठेवलेले आहेत. सधन वर्ग आहे तो बघतोय. एका बाजूला कॉर्पोरेट बालनाटय़ाचे आकर्षण अमाप आहे. जी पारंपरिक नाटकं आहेत, त्यांना प्रेक्षक मिळेनासा झालेला आहे. लोहचुंबकासारखं कॉर्पोरेट नाटकाने त्यांना आकर्षित करून घेतलेलं आहे. काही संस्थांनी असा उपाय शोधून काढलेला आहे की, शाळा शाळेत जाऊन बालनाटय़ मोफत दाखविण्याची घोषणा करतात. गर्दी जमवितात. त्यांच्याबरोबर येणाऱ्या पालकांना मात्र तिकीट काढावयास लावतात. अशा दोन पद्धतीनं गर्दी जमविण्याचे प्रयोग सुरू आहेत. जाहिराती दिलेल्या बालनाटय़ांना,  फक्त कॉर्पोरेट बालनाटय़ांना गर्दी होताना दिसत आहे. तिकीट दर ही मुख्य अडचण आहे. माझ्या मते ती नसावी. त्यामुळे मी जाहिरातीत स्पष्टपणे वयाचा उल्लेख हा करतो. सादर होणारं बालनाटय़ हे कुठल्या वयासाठी आहे ते प्रेक्षकांना समजते.

व्यावसायिक नाटकांना सरकारचे अनुदान मिळते, पण तसे बालनाटय़ांना मिळत नाही. ही खंत राजू तुलालवार यांनी व्यक्त केली. बालनाटय़ निर्माते  आर्थिक मदतीची अपेक्षा करत नाहीत, असे ते म्हणाले.

बाल रंगभूमी परिषद स्थापन झाली दोन वर्षांपूर्वी. त्या परिषदेत व्यावसायिक बालनाटय़ निर्मात्यांना आर्थिक अडचणींबद्दल विचारण्यात आले होते, पण बहुतेक निर्मात्यांनी स्वतःची वाट शोधलेली होती. त्यांनी आर्थिक नुकसान झालेले सांगितले, पण मदतीची अपेक्षा केली नाही. बालनाटय़ निर्माते कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी या आधी कधीही अवलंबून नव्हते आणि यापुढेही नसतील, असे राजू तुलालवार म्हणाले.

 कुमार नाटय़ाचा प्रयोग

या वर्षी दिवाळीत कुमार नाटय़ आणण्याचा प्रयत्न केला असल्याचे राजू तुलालवार यांनी सांगितले.  9 ते 16 वयोगटातील मुलांना वेगळे विषय लागतात. ते आम्ही कुमार बालनाटय़ात मांडलेले आहेत. पारंपरिक बालनाटय़ापेक्षा वेगळी ती नाटकं त्यांना आवडू लागलेली आहेत. पारंपरिक विचारधारा प्रेक्षकांची आहे. ती परंपरा मोडण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. त्याला हळूहळू यश हे येईल. मला वाटतं की, प्रेक्षक चळवळीची गरज आहे. त्या चळवळीसाठी प्रयत्नही करावे लागतील. कारण त्यासाठी महाराष्ट्रात बालप्रेक्षक घडविण्यासाठी काहीच झालेलं नाही. उलट शिबिरांमुळे बालकलाकार घडविले गेले, असेही त्यांनी सांगितले.