
>> आर. एम. विशाखा
विमा हे जोखीम व्यवस्थापन करणारे एक साधन आहे. विमा क्षेत्राने अनेक जागतिक महामारी पाहिल्या. विमा कंपन्या त्यांच्या व्यवसाय मॉडेलमध्ये अशा संभाव्य जोखमींचा समावेश करतात. हे विमाकर्ते संभाव्य जोखीम परिणामांचे विश्लेषण करतात. ते परिस्थितीचा सामना करण्यासाठी सदैव सज्ज असतात.
कोविडच्या अभूतपूर्व संकटाने अनेक आव्हाने उभी केली आहेत. कंपन्यांना कर्मचाऱयांचे आरोग्य, त्यांची सुरक्षा, विस्कळीत कार्यप्रणाली, रोकड कमतरता, संकट व्यवस्थापनासाठी नवीन धोरणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या कठीण काळात प्रतिसाद यंत्रणेचा अवलंब करणे यासंबंधी विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अशा स्थितीत संपूर्ण विमा उद्योग, पॉलिसीधारकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी एकजुटीने उभा आहे.
कोविड-19 च्या आर्थिक परिणामामुळे सामान्य नागरिक चिंतेत असून तो त्याच्या खर्चाचे आणि बचतीचे विचारपूर्वक नियोजन करत आहे. शेअर बाजारातील घसरण आणि अस्थिर वातावरणामुळे जोखीम व्यवस्थापन तसेच विम्याकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन बदलला आहे. ही परिस्थिती पाहता, विमा प्रदात्यांवरील जबाबदारी अजूनच वाढलेली जाणवते. आर्थिक सुरक्षेसाठी जोखीम कमी करण्याचे साधन म्हणून विम्याचे महत्त्व आणि विम्याला प्राधान्य देण्याची गरज या बाबी अधिक मजबूत करणे आवश्यक आहेत. व्यक्तींचे आर्थिक कल्याण सुनिश्चित करण्यात विमा उद्योग एक महत्त्वाची जबाबदारी पार पाडताना दिसते. ज्याप्रमाणे वैद्यकीय सेवा शारीरिक आणि मानसिक आरोग्य राखण्यात भूमिका बजावतात त्याचप्रमाणे विम्यास प्राधान्य देण्याची जास्त गरज आहे आणि त्या दिशेने पावले उचलत, प्रत्येक व्यक्तीची मानसिकता बदलून ‘सबसे पहले लाइफ इन्शुरन्स’ हे मत त्यांच्यावर बिंबवणे आवश्यक आहे.
बाजारातील अस्थिरतेची जोखम समजून घेताना अनेकदा, जोखीम विरुद्ध परतावा, ई रोखे, नैसर्गिक आपत्ती, लॉक इन कालावधी आणि अशा इतर अनेक अटींचा अभ्यास करणे गरजेचे आहे. वर्तमान बाजारपेठेच्या स्थितीचा तुमच्या गुंतवणुकीवर आणि ठरावीक कालावधीत जमा झालेल्या परताव्यावर होणारा परिणाम हे बाजारातील अस्थिरतेचे एक साधे उदाहरण म्हणता येईल. बाजारातील अस्थिरतेपासून संरक्षण ही विमा कंपन्यांची खासियत म्हटली जाऊ शकते. विमा कंपन्या, पॉलिसी खरेदीच्या वेळी दिलेल्या हमी वचनांचे पालन करण्यास सक्षम आहेत.
कोविडसारख्या साथीचे आजार आणि अनिश्चित स्वरूप पाहता ‘आजच जगून घ्या, उद्याचा सूर्य दिसणार की नाही याची शाश्वती नाही’ असे तत्त्वज्ञान लोक मांडतात. याबाबतीत आम्ही महत्त्वाचा सल्ला देणे अपरिहार्य वाटतो, तो म्हणजे ‘भविष्यासाठी बनवलेल्या योजना रद्द होऊ देऊ नका आणि प्रीमियम भरणे बंद करू नका’ विम्यातील गुंतवणुकीमागील दृष्टिकोन ‘सेफ्टीफस्ट’ तत्त्वज्ञानावर आधारित आहे. यातील गुंतवणूक इक्विटी असो किंवा डेट फंड असो, अस्थिर काळात लोकांना आधार देणे हे उद्दिष्टय़ आहे राष्ट्र उभारणीच्या दिशेने ते एक योगदान आहे.
डिजिटल सेवा
कोविड-19 च्या प्रसारादरम्यान विमा उत्पादनांची डिजिटल विक्री आणि डिजिटल सेवा देण्याच्या दिशेने वाटचाल झाली. ऑनलाइन वितरण पोर्टल्सद्वारे असे दिसून आले आहे की, या कालावधीत जीवन विम्यामध्ये 20 टक्के वाढ झाली आहे. यातून, लोकांना विम्याचे महत्त्व पटत असल्याचे दिसून येत आहे.
(व्यवस्थापकीय संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी, इंडिया फस्ट लाइफ इन्शुरन्स कंपनी)
























































