
बॉलीवूडच्या किंग खानला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या चार चाहत्यांचे महागडे मोबाईल चोरटय़ाने लांबवल्याची घटना घडली आहे. मोबाईल चोरीप्रकरणी वांद्रे पोलिसांनी दोन गुह्यांची नोंद करून तपास सुरू केला आहे.
शाहरुख खानचा आज वाढदिवस आहे. त्याला शुभेच्छा देण्यासाठी मंगळवारी रात्री किंग खानचे चाहते ‘मन्नत’ बंगल्याजवळ आले होते. कोविडमुळे दोन वर्षे शाहरुखला शुभेच्छा देण्यासाठी त्याचे चाहते ‘मन्नत’ बंगल्याजवळ येऊ शकले नव्हते. त्यामुळे यंदा किंग खानचे चाहते मोठय़ा संख्येने मन्नत बंगल्याबाहेर आले होते. मंगळवारी रात्री आठ वाजल्यापासून चाहते मन्नत बंगल्याबाहेर शाहरुखला पाहण्यासाठी उभे होते. रात्री दहानंतर चाहत्यांची गर्दी वाढू लागली. तेथे काही अनुचित घटना घडू नये म्हणून स्थानिक पोलीस तैनात होते.
रात्री साडेबाराच्या सुमारास शाहरुख हा नेहमीप्रमाणे बंगल्याच्या गेटवर आला. तेथे गर्दीचा फायदा घेऊन चोरटय़ाने चार जणांचे महागडे मोबाईल चोरून नेले. मोबाईल चोरी झाल्याचे लक्षात येताच चौघांनी वांद्रे पोलीस ठाण्यात धाव घेतली. वांद्रे पोलिसांनी दोन स्वतंत्र गुह्यांची नोंद करून तपास सुरू केला आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलीस त्या चोरटय़ाचा शोध घेत आहेत. 2017 सालीदेखील शाहरुखच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या 20 चाहत्यांचे मोबाईल चोरीला गेले होते.

































































