
माण तालुक्यातील म्हसवड-मार्डी रस्त्याची गेल्या वर्षभरापासून दयनीय अवस्था झाली असून, वारंवार मागणी करूनही संबंधित विभागाकडून कानाडोळा करण्यात येत आहे. पावसाने हा रस्ता जागोजागी उखडला तर आहेच; पण ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघातांची मालिका सुरूच असून, या मार्गावरून प्रवास करताना ‘अंगाचा खिळखिळा नी वाहनांचा खुळखुळा’ होत असल्याची संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
या मार्गावर पुढे संपूर्ण महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश व कर्नाटकमधील लाखो लोकांचे आराध्य दैवत असलेल्या शिखर शिंगणापूरच्या शंभू महादेवाचे मंदिर आहे. त्यांच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक या रस्त्याचा वापर करीत असतात. या भाविकांना खराब रस्त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यासाठी या मार्गाची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी गेल्या वर्षभरापासून वाहनचालक करीत आहेत.
फलटण-शिंगणापूर-म्हसवड -शेनवडी या रस्त्याचा भाग असलेला म्हसवड-मार्डी हा रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला असून, यापैकी म्हसवड ते वरकुटे हा भाग तर अतिपावसामुळे अनेक ठिकाणी खचून वाहतुकीसाठी धोकादायक ठरत आहे. या रस्त्यावरून कामानिमित्ताने दररोज प्रवास करणाऱ्यांना मणक्याचे विकार सुरू झाले आहेत, तर अनेक प्रवाशांनी आपले मार्ग बदलले आहेत.
या रस्त्यावरून मुंबई, ठाणे, पुणे, फलटण, बारामतीत, आटपाडी, सांगोला, जत या भागांत जाणाऱ्या एसटी बसेस व खासगी वाहनांमधून हजारो प्रवासी प्रवास करीत असतात. या रस्त्याच्या साइडपट्टय़ा गेल्या दहा वर्षांत भरल्या नसल्याने डांबरीकरण केलेला भाग व साइडपट्टी यामध्ये अनेक ठिकाणी एक फुटापर्यंतचे अंतर पडले आहे. त्यामुळे दुचाकीसह चारचाकी वाहणे घसरून दररोज अपघात होत आहेत. यामुळे प्रवाशांच्या हातपाय मोडण्याबरोबरच डोक्याला मार लागण्यामुळे अनेक प्रवासी जायबंदी होत आहेत. वाहनांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. समोरून येणाऱ्या वाहनांना बाजू देण्यावरून वाहनचालकांमध्ये भांडणेही होत आहेत. अनेकवेळा या रस्त्यावर लहान-मोठे अपघातही झाले आहेत.
या मार्गाची दुरुस्ती व्हावी, यासाठी वृत्तपत्राच्या माध्यमातून अनेकवेळा आवाज उठवण्यात आला आहे. मात्र, संबंधित विभागाचे अधिकारी मात्र हेतुपुरस्सर याकडे कानाडोळा करताना दिसत आहेत.
या रस्त्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दहीवडी कार्यालयाकडे विचारणा केली असता, राज्य महामार्ग 13 या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचा प्रस्ताव कार्यालयाकडून वारंवार पाठवला आहे. पण, त्या कामास मंजुरी मिळत नाही, असे सांगण्यात आले.



























































