
पुणे शहर परिसरात रात्रीच्या वेळी महिलांकडील पर्स, मोबाईल हिसकवणार्या दोघांना येरवडा पोलिसांच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून चोरीचे 7 मोबाईल, दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. अदित्य उर्फ बच्चू भारत जाधव (20, रा. वडगाव शेरी), राज महेश कांबळे (21, रा. येरवडा) असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
काही दिवसांपूर्वी येरवड्यातील कल्याणीनगर भागातून मैत्रिणीसोबत पायी जाणार्या तरूणीकडील पर्स हिसकावून नेल्याची घटना घडली होती. याबाबत दाखल झालेल्या गुन्ह्यात येरवडा पोलीस आरोपीच्या मागावर होते. या दरम्यान आरोपी जाधव हा चोरीचा मोबाईल वापरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानूसार जाधवला ताब्यात घेतले असता त्याने गुन्हा केल्याची कबूली दिली. जाधव याने साथीदार कांबळे यांच्यासह शहराच्या इतर भागातून देखील मोबाईल चोरले असून त्यांच्याकडून सात मोबाईल, दुचाकी असा 3 लाख 9 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बाळकृष्ण कदम, गुन्हे निरीक्षक उत्तम चक्रे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार किरण घुटे, तुषार खराडे, राहुल परदेशी यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.



























































