
गुजरातमधील विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या असून राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. मात्र निवडणुकीपूर्वीच भाजपला मोठा धक्का बसला आहे. गुजरातमधील भाजप सरकारमध्ये आरोग्यमंत्री राहिलेले जय नारायण व्यास यांनी भाजपाला राम राम ठोकला आहे. जय नारायण व्यास हे लवकरच काँग्रेस किंवा आम आदमी पक्षात सामील होतील. मागच्या काही काळात त्यांची या दोन्ही पक्षांसोबत जवळीक वाढली होती. आम आदमी पक्षाच्या जोरदार प्रचारामुळे गुजरातमध्ये आगामी विधानसभा निवडणूक लढत तिरंगी होण्याची शक्यता आहे.
2007 ते 2012 या काळात माजी आरोग्य मंत्री जय नारायण व्यास गुजरात सरकारमध्ये मंत्री होते. भाजपने त्यांना बराच काळ बाजूला ठेवले होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची भेट घेतली आहे. एवढेच नाही तर आम आदमी पक्षाच्या काही नेत्यांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता ते कोणत्या पक्षात प्रवेश करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


























































