>> अरुण जोशी
एव्हाना पाऊस थांबून स्वच्छ उन्ह पडायला सुरुवात झाली असली, तरी पावसाळय़ानंतरचा हिरवागार निसर्ग मनाला खुणवत राहील. आता येणाऱया थंडीतले काही महिने तरी सभोवतालच्या डोंगर-दऱया वनश्रींच्या हिरवाईने भरलेल्या दिसतील. आपल्या या लेखमालेत अशा वेळेला एका गाण्याचा उल्लेख करायला हवा- ‘हिरवा निसर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने, मन सरगम छेडा रे, जीवनाचे गीत गा रे, धुंद व्हा रे!’
गायक आहे अत्यंत सुरेल स्वर लाभलेला सोनू निगम. ‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं हे जितेंद्र कुलकर्णी यांनी संगीत दिलेलं गीत. पडद्यावरही सोनू निगमच गातो. एका बसमधल्या प्रवासातला प्रवासी होऊन या गाण्याने तो धमाल उडवतो. गाणं अर्थातच नेटच्या माध्यमातून पाहता येतं.
सोनू केवळ गायक नाही. बालपणापासूनच तो स्टेजवर वावरणारा ‘परफॉर्मिंग आर्टिस्ट’ आहे. त्याचे वडील अगम कुमार निगम हेसुद्धा उत्तम गायक. त्यांच्या ऑर्केस्ट्रामध्ये सोनूने अवघ्या चौथ्या वर्षी ‘क्या हुआ तेरा वादा, ये कसम ये इरादा’ हे ‘हम किसी से कम नहीं’ या चित्रपटातलं गाणं गाऊन लोकांची वाहवा मिळवली. मग वडिलांबरोबर तो सातत्याने गाऊ लागला आणि पुढे 1995 मध्ये तो ‘सा रे ग म’चं सूत्रसंचालन करत असताना त्याचे वडील त्याच्या कार्यक्रमात गायिले! एक सुरेल वर्तुळ पूर्ण झालं. गेल्या काही वर्षांत जे पुरुष स्वर संगीतक्षेत्रात आले, त्यात सोनूचा आवाज विलक्षण ताकदीचा आहे. रफी, लता यांनी सिनेसृष्टीतल्या संगीताचं एक युग घडवलं. सोनूने रफीसाहेबांची गाणी भक्तीभावाने गायिली. लता मंगेशकर यांच्यासह तर ‘डय़ूएट’ गीत गाण्याचं भाग्य त्याला लाभलं. सिनेक्षेत्रात स्वतंत्र ठसा उमटविण्यापूर्वी सोनू ‘रफीसाहेबांचा आवाज’ म्हणून ओळखला जायचा. अर्थातच ही त्याच्या गोड गळय़ाला मिळालेली रसिकांची दाद होती.
लता मंगेशकर यांची गाणी सोनूने अनेक कार्यक्रमात गायिली. दीदी गेल्यावर त्यांना गान श्रद्धांजली अर्पण केली. ‘मेरी आवाज ही पहचान है’ किंवा ‘लग जा गले’सारखी भावोत्कट गाणी त्याने तेवढय़ाच उत्कटतेने सादर केली. 1973 मध्ये हरयाणातील फरिदाबाद येथे जन्मलेला हा गुणी गायक 19 व्या वर्षी वडिलांसमवेत मुंबई नावाच्या उत्कर्ष नगरीत आला. कोणत्याही क्षेत्रात सर्वंकष प्रगती करायची इच्छा असलेल्या हिंदुस्थानी व्यक्तीला कधी ना कधी मुंबई गाठावीच लागते. त्यातच सिने क्षेत्रातल्या लोकांना तर पर्यायच नाही. मुंबईत आल्यावर सोनूचा पाश्चात्त्य संगीताशीही परिचय झाला. मात्र उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांच्याकडून त्याने हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचं रीतसर शिक्षणही घेतलं. स्वरांवर हुकूमत असण्याची नैसर्गिक देणगी आणि त्याचे प्रयत्न यातून त्याची गाणी हिंदी चित्रपटांना उठाव आणू लागली.
त्या गाण्यांपैकी ‘अच्छा सिला दिया’ हे बेवफा चित्रपटातलं गाणं खूप गाजलं. ‘सरफरोश’मधल्या ‘जिंदगी मौत ना बन जाये यारो’ने प्रेक्षकांना रोमांचित केलं. ‘बॉर्डर’मधलं ‘संदेसे आते है’ तसंच ‘दिल चाहता है’मधलं ‘तनहाई’ हे एक भावविभोर गाणं, ‘साथी’ या चित्रपटातील गाण्यांसाठी त्याला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. त्याच्या गानसेवेचं कौतुक होऊन तो ‘पद्मश्री’सुद्धा तरुण वयातच झाला. जगातल्या अनेक देशांतले कार्यक्रम – कधी रोमांटिक, कधी रॅप तर कधी गझल किंवा भक्तिगीतं – सोनूचा स्तर सर्वच गानप्रकारांना न्याय देतो.
आता त्याच्या ‘मराठी’ गाण्यांविषयी सांगायचं तर ही अलीकडची बहुतेक गाणी रसिकांच्या, विशेषतः तरुणांच्या लक्षात असतीलच. ‘दुनियादारी’ चित्रपटातलं ‘टिक टिक वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात’ हे मंगेश कंगणे यांचं (कोरससह) गाणं किंवा ‘लय भारी’ सिनेमातलं गुरू ठाकूर यांचं सोनू आणि श्रेया घोषाल यांनी गायिलेलं गीत सहज आठवेल. त्या ‘जीव भुलला’ या गाण्याचं संगीत आहे अजय-अतुल यांचं. ‘मन माझे हरवले कुठे हे ना कळे’ हे अखिल जोशी यांचं द्वंद्वगीत सोनू निगम आणि आनंदी जोशी यांनी गायिलंय आणि त्याचं संगीत आहे अभिजीत नार्वेकर यांचं. ‘स्वप्न चालून आले बघता बघता, माझे होऊन गेले हसता हसता’ हे क्षितिज पटवर्धन यांचं पंकज पडघन यांनी संगीत दिलेलं गाणं सोनू निगम यांनी सायली पंकज यांच्यासह गायिलं आहे, ‘क्लासमेट्स’ चित्रपटासाठी.
सोनू अजून तरुण आहे. खूप मोठी गानकारकीर्द तो घडवू शकतो. आजच जगात अनेक ठिकाणी त्याच्या नावाचा, आवाजाचा बोलबाला आहे. सोनू लता-आशा यांचा भक्त आहे. तो म्हणतो, लता आणि आशा संगीताच्या, स्वरांच्या देवता आहेत. सोनू लतादीदींबद्दल म्हणतो, मी अमुक एक गाणं कसं गायिलंय सांगा, असं विचारून मी कधी त्यांना त्रास दिला नाही. त्या मात्र (कौतुकाने) मेसेज करतात. त्यांना अनेक वर्षे ओळखतो, पण त्यांना भेटल्यावर पटकन काही कसं विचारायचं असं वाटतं. त्यांच्यासह पहिलं गाणं गायिलं. त्यानंतर त्यांनी सैगलना श्रद्धांजली वाहणारं गाणं पाठवलं. ते होतं ‘सो जा राजकुमारी सो जा.’ 21 मे 2022 रोजी परदेशात असलेल्या सोनूने ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे ‘तू जहां जहां रहे’ आणि ‘लग जा गले’ ही गाणी गाऊन श्रद्धांजली वाहिली. त्यावेळी प्रेक्षकांनीही साथ दिली. ते भारावलेले क्षण यूटय़ुबवर उपलब्ध आहेत.





























































