
शिवसेना नेते युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज सोमवारी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदार संघात जाहीर सभा घेत राज्य सरकार आणि अब्दुल सत्तार यांच्यावर टीकेची तोफ डागली. राज्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच मोठ्या प्रमाणात नुकसान केले सर्वत्र ओला दुष्काळाची मागणी होत असताना कृषिमंत्री ओला दुष्काळ नाहीच आहे असं म्हणत आहेत. या गद्दारांनी पन्नास खोके घेऊन स्वतःचा दुष्काळ संपवला पण यांना राज्यातील ओला दुष्काळ दिसत नाही आहे, अशी खरमारीक टीका आदित्य ठाकरे यांनी केली.
आदित्य ठाकरे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांचे प्रश्न जाणून घेत आहेत. आदित्य ठाकरे सोमवारी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघात जाऊन जाहीर सभा घेतली. या सभेत शेतकऱ्यांना मदत न करणाऱ्या राज्य सरकारचा खरपूस समाचार घेतला. गद्दारांनी 50 खोके घेऊन स्वतःचा दुष्काळ संपवला पण शेतकऱ्यांचं काय? ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत द्यावीच लागेल, असं आदित्य ठाकरेंनी सरकारला ठणकावलं.
आदित्य ठाकरे यांनी रोजगाराच्या मुद्द्यावर देखील राज्य सरकारवर टीकेची तोफ डागली. महाराष्ट्रात येणारे रोजगार गुजरातमध्ये गेले. या गद्दारांची चांगली व्यवस्था केली म्हणून धन्यवाद देण्यासाठी या गद्दार सरकारने हे उद्योग गुजरातला दिले का? असा संतप्त सवाल आदित्य ठाकरे यांनी केला. एका गद्दाराच्या राक्षसी महत्वकांक्षेमुळे राज्य मागे जात आहे. यांचं हिंदुत्व हे राक्षसी हिंदुत्व आहे. आपलं हिंदुत्व हे रामाचं हिंदुत्व आहे. आपलं हिंदुत्व हे हृदयात राम आणि हाताला काम असं हिंदुत्व आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.



























































