
ऐतिहासिक व हेरिटेज वास्तू असलेल्या मेन राजाराम शाळेवरून आंदोलनाची धार वाढत असतानाच आता माजी खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनीही मेन राजाराम शाळेची वास्तू शिक्षण व शिक्षणाशी निगडित बाबींसाठीच वापरावी, असे पत्रच केसरकर यांना लिहिले आहे.
कोल्हापूरचे छत्रपती राजाराम महाराज (द्वितीय) यांनी आपल्या राज्याची शैक्षणिकदृष्टय़ा प्रगती व्हावी, या उद्देशाने जुन्या राजवाडय़ानजीक भव्य वास्तू बांधून तेथे त्यांनी हायस्कूल सुरू केले. छत्रपती राजघराण्याचे तत्कालीन निवासस्थान असलेल्या जुन्या राजवाडय़ापेक्षाही देखणी व भव्य अशी वास्तू महाराजांनी उभी केली. या भव्यतेमधून महाराजांना शिक्षणाचे महत्त्व सांगायचे होते.
मेन राजाराम हायस्कूल या नावाने आजही येथे विद्यादानाचे पवित्र कार्य चालते; परंतु काही कारणास्तव या वास्तूमधील मेन राजाराम हायस्कूल स्थलांतरित करत असल्याचे समजले. त्यामुळे ज्या उदात्त हेतूने छत्रपती राजाराम महाराजांनी या वास्तूची उभारणी केली, तो हेतू लक्षात घेऊन या वास्तूचा उपयोग करण्यात यावा. शिक्षणाशी निगडित असलेल्या कारणांसाठीच या वास्तूचा उपयोग व्हावा, हीच कोल्हापूरकरांची भावना आहे. याचा विचार करूनच निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केली आहे.
कोल्हापूरकरांचा विरोध
गोरगरीब शिक्षणाच्या प्रवाहात कसे येतील, याचा शिक्षणमंत्री म्हणून विचार करण्याऐवजी पटसंख्या कमी असल्याच्या नावाखाली अशा शाळाच बंद करण्याच्या पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या प्रयत्नांना कोल्हापूरकरांकडून प्रचंड विरोध होऊ लागला आहे.






















































