
मी भिडे गुरुजींना ओळखत नाही, केवळ वयाचा आदर म्हणून त्यांच्या पाया पडले, असे स्पष्टीकरण इन्फोसिस कंपनीच्या संस्थापिका सुधा मूर्ती यांनी दिले. महिला पत्रकाराला कुंकू लावण्यावरून केलेल्या वादग्रस्त विधानामुळे शिवप्रतिष्ठान संघटनेचे नेते संभाजी भिडे यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. त्यातच सुधा मूर्ती या एका कार्यक्रमात संभाजी भिडे यांच्या पाया पडल्याचे फोटो समोर आल्यानंतर अनेकांनी सुधा मूर्ती यांच्यावरदेखील निशाणा साधला. अखेर याप्रकरणी सुधा मूर्ती यांनी आपली बाजू मांडली आहे.
सुधा मूर्ती म्हणाल्या, ‘मला त्यांच्याबद्दल काहीही माहिती नाही. पण ते वयाने मोठे आहेत. आपली संस्कृती आहे की थोरल्या माणसाला बघितले की त्याच्या पाया पडायचे. त्यांचे मत काय, मतभेद काय, त्यांच्याशी मी काही बोललेच नाही.’ पुढे मूर्ती यांनी सांगितले, ते म्हणाले ‘तुमचा टाइम द्या, मी म्हटले माझ्याकडे वेळ नाही, मी खूप बिझी आहे, फेब्रुवारी-मार्चमध्ये बघते एवढेच, त्यांच्याबद्दल मला काहीही माहिती नाही, वर्तमानपत्रामध्ये आणि ट्विटरमध्ये आले तेव्हा माहिती झाले.’































































