
कोरोनाने काढता पाय घेताला असतानाच आता लहान मुलांसाठी घातक असलेल्या बोका व्हायरसने नवी मुंबईत एण्ट्री केली आहे. अत्यंत दुर्मिळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या व्हायरसचा व्हायरसचा संसर्ग झालेल्या दोन वर्षांच्या चिमुरड्यावर खारघर येथील मेडिकव्हर रुगणालयात यशस्वी उपचार करण्यात आले. गेल्या चार माहिन्यांत बोका व्हायरसची लागण झालेले पाच रुग्ण या रुग्णालयात दाखल झाले होते. आता सर्व जण ठणठणीत बरे झाले. दरम्यान या बोका व्हायरसमुळे लहान मुलांना धोका असून त्यांची काळजी घेण्याचे आवाहन डॅाक्टरांनी पालकांना केले आहे.
एका दोन वर्षाच्या चिमुड्याला बोका व्हायरसचा संसर्ग झाल्यांनतर त्याला मेडिकव्हर रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याला संसर्ग झालेला व्हायरस हा टाईप एकचा होता. त्याला श्वसनाचा त्रास होत असल्याने त्याची ऑक्सिजनची लेव्हल 85 पर्यत खाली घसरली होती. त्यामुळे त्याच्यावर हाय-फ्लो ऑक्सिजन, स्टिरॅाइड्स, नेब्युलायझेशन आणि लक्षणात्मक उपचार तातडीने सुरू करण्यात आले. या मुलाचे प्राण वाचवण्यात डॅाक्टरांना यश आले आहे. गेल्या चार महिन्यांत बोका व्हायरसचा संसर्ग झालेल्या पाच बालकांवर उपचार करण्यात आले आहेत, बालरोग विभागाचे प्रमुख डॅा. संदीप सावंत यांनी सांगितले.
चाचण्या अत्यंत महागड्या
बोका व्हायरसचे नाक, शौच, आणि रक्ताच्या नमुन्यांचे निदान पीसीआर चाचणी खूप महाग असल्याने त्या चाचण्या नियमितपणे केल्या जात नाहीत. तीव्र स्वरुपाच्या श्वसनाचा त्रास असलेल्या मुलांमध्येच शक्यतो ही चाचणी केली जाते. या विषाणूच्या प्रादुर्भावाचे प्रमाण 1.5 टक्क्यांपासून ते 19.3 टक्क्यांपर्यत आहे. हा विषाणू वर्षभर आढळतो. परंतू प्रामुख्याने हिवाळ्यात आणि हिवाळा तसेच उन्हाळ्याच्या मधल्या काही दिवसांमध्ये हा जास्त प्रमाणात आढळतो, अशी माहिती बालरोगतज्ञ यांनी दिली.
ही आहेत लक्षणे
बोका व्हायरस हा प्रामुख्याने लहान मुलांमध्ये आढळून येतो. हिवाळ्यामध्ये या व्हायरसचा संसर्ग होण्याचा मोठा धोका असतो. बोका व्हायरसमध्ये टाईप 1, टाईप 2, आणि टाईप 4 सारखे अनेक प्रकार आहेत. टाईप 1 विषाणू प्रामुख्याने श्वसनमार्गच्या संसर्गाशी संबंधित आहे. टाईप 2 आणि 4 अतिसार, ओटी पोटात दुखणे इत्यादी लक्षणांसह गॅस्ट्रोएन्टेरोलॅजी म्हणजेच पोटाच्या विकाराशी संबंधित संसर्ग आहे. हा विषाणू प्रामुख्याने तीन वर्षाखालील मुलांना संक्रमित करतो. या विषाणूची लक्षणे इतर इन्फ्लूएंझा विषाणूंसारखीच आहेत. खोकला, सर्दी, आणि श्वसनमार्गाच्या संक्रमणाचा यात प्रामुख्याने समावेश. त्यामुळे हा व्हायरस लवकर ओळखणे आव्हानात्मक ठरत आहे.























































