
व्याजाने घेतलेल्या पाच लाखांची परतफेड केल्यानंतरदेखील व्याजाचा हप्ता वेळेत दिला नाही म्हणून दिवसाला 15 हजार रुपये दंडासह 18 लाखांची मागणी करणार्या खासगी सावकारावर खंडणी विरोधी पथकाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रसाद किसन कुतळ (45, रा. रास्ता पेठ) असे गुन्हा दाखल झालेल्या अवैध सावकाराचे नाव आहे. याबाबत 34 वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. पाोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, फिर्यादी यांचा दुधाचा व्यवसाय आहे. त्यांना पैशांची गरज असल्याने त्यांनी कुतळ याच्याकडून 10 टक्के व्याजदराने 5 लाख रुपये घेतले होते. फिर्यादी यांनी या पैशांची वेळोवेळी परतफेड केली आहे. काही पैसे रोख स्वरूपात तर काही ऑनलाईन असे एकूण 5 लाख 95 हजार रुपये परत करण्यात आले आहेत. असे असताना देखील फिर्यादी यांनी वेळेत व्याजाचा हप्ता दिला नाही म्हणून कुतळ याने महिन्याला पंधरा हजारांच्या दंडाची मागणी केली.
दंडासह एकूण 18 लाख 10 हजार रूपयांची मागणी करून पैसे न दिल्यास फिर्यादीच्या घरी जावून दमदाटी केली. याबाबत प्राप्त तक्रार अर्जानूसार खंडणी विरोधी पथक दोनचे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी चौकशी केली. पुराव्याअंती कुतळ याच्यावर लष्कर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र सावकारी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, उपनिरीक्षक मोहनदास जाधव, श्रीकांत चव्हाण, अंमलदार प्रदीप शितोळे, शैलेश सुर्वे, सुरेंद्र साबळे, संग्राम शिनगारे यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.
























































