हिमालय पूल मेपर्यंत सुरू होणार; स्टीलचा ब्रिज, सरकत्या जिन्यांची सुविधा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळच्या ‘हिमालय’ ब्रिजचे बांधकाम मे महिन्यापर्यंत पूर्ण होणार असून प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. या ठिकाणी स्टीलचा ब्रिज बनवण्यात येणार असून प्रवाशांच्या सोयीसाठी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ इमारतीच्या बाजूने सरकत्या जिन्यांची सुविधाही केली जाणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी सांगितले.

अंधेरीत जुलै 2018 रोजी गोखले पूल कोसळून दोन जणांचा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील हिमालय पूल 14 मार्च 2019 रोजी कोसळून झालेल्या दुर्घटनेत सात जणांचा बळी गेल्यानंतर मुंबईतील धोकादायक पुलांचा प्रश्न ऐरणीवर आला. त्यामुळे पालिकेने मुंबईतील सर्व रस्त्यांवरील पूल, उड्डाणपूल, रेल्वे आणि पादचारी पुलांचे पुन्हा स्ट्रक्चरल ऑडिट करून धोकादायक पुलांची दुरुस्ती व पुनर्बांधणीचे काम वेगाने हाती घेतले आहे. यामध्ये हिमालय पूल स्टीलचा बनवण्यात येणार आहे. यासाठी दोन्ही बाजूंनी पिलर बांधून तयार झाले आहेत, तर स्टीलचे गर्डर दुसऱया ठिकाणी तयार करून या ठिकाणी आणून बसवले जाणार आहेत. गर्डर बनवण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच हा पूल उभारून वाहतुकीसाठी सुरू करता येईल, असे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी सांगितले.

असा होणार स्टीलच्या ब्रिजचा फायदा

स्टेनलेस स्टीलवर खाऱया हवेचा परिणाम होणार नसून गंजण्याचा धोकाही टळणार आहे. त्यामुळे या पुलावरून प्रवाशांना बिनधास्तपणे ये-जा करता येणार आहे. शिवाय पुलाची मजबुतीही वाढणार आहे. पुलाच्या नव्याने होणाऱया बांधकामासाठी सुमारे सात कोटींचा खर्च केला जात आहे.

गोखले ब्रिज रेल्वेनेच पाडावा

अंधेरी येथील धोकादायक गोखले ब्रिज 7 नोव्हेंबरपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. या पुलाचे पालिका हद्दीमधील बांधकाम एप्रिलपासून सुरू करण्यात आले आहे, तर रेल्वे हद्दीमधील ब्रिज पाडण्याचे कामही बाकी आहे. मात्र हा पूल रेल्वेनेच पाडावा अशी भूमिका पालिकेने घेतली आहे. याबाबत उद्या निर्णायक बैठक होणार असल्याचे पी. वेलरासू यांनी सांगितले.