नाटय़रंग – पुनर्रचित सीता स्वयंवर महत्त्वाचा दस्तावेज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>डॉ. प्रवीण भोळे

विष्णुदास भाव्यांनी 1843 मध्ये ‘सीता स्वयंवर’ हे नाटक सादर केले जे लिखित स्वरूपात नव्हते. संहिता उपलब्ध नसलेल्या नाटकाची रंगावृत्ती एका वेगळ्या स्वरूपात ‘पुनर्रचित सीता स्वयंवर’ या पुस्तकाच्या रूपाने प्रवीण भोळे यांनी सादर केली आहे. नाटय़ कलाकृती व नाटय़ इतिहासातील महत्त्वाचा दस्तावेज अशा दोन्ही पातळय़ांवर हे पुस्तक महत्त्वाचे आहे.

मराठीतल्या पहिल्या नाटकाच्या संदर्भात अनेक दावे आहेत. कोणी म्हणतं, भाव्यांचं सीता स्वयंवर पहिलं, तर कोणी म्हणतं, किर्लोस्करांचं शापुंतल. काही लोकांच्या मते फुल्यांचं तृतीय रत्नच खरं पहिलं तर काही लोक पहिलेपणाचा मान तंजावरच्या भोसले राजांनी लिहिलेल्या नाटकांना देतात. वाद हा चालूच राहणार. अगदी वर्षांप्रमाणेच पाहिलं तर 1843 मध्ये वर्षभरात कधीतरी सादर झालेलं ‘सीता स्वयंवर’ हे मराठी मातीतलं सगळय़ात जुनं नाटक मानता येईल. त्या सुमारास सांगलीचे संस्थानिक चिंतामणराव पटवर्धन होते. तिथल्या गणपती मंदिरात उत्तर कानडातील करकी गावच्या मेळय़ाचा प्रयोग सादर करण्यात आला होता. हा प्रयोग कानडी भाषेतला होता, परंतु संस्थानातल्या बहुसंख्य लोकांची भाषा मराठी असल्यामुळे पटवर्धन राजांना वाटलं की, मराठीतून असं काहीसं सादर व्हावं म्हणून मग त्यांनी त्यांच्या दरबारातले एक मानकरी अमृत भावे यांच्यापाशी ही आपली इच्छा व्यक्त केली. भाव्यांचा तरुण मुलगा विष्णुदास गाणी वगैरे रचायचा, लाकडी बाहुल्या तयार करायचा, म्हणून त्याच्या वडिलांनी त्याच्यावरच ही जबाबदारी सोपवली.

त्या काळी मराठी प्रांतात लोकरंगभूमीचे विविध प्रकार दिसून येत होते. धार्मिक ग्रंथांची प्रवचने, त्यातील कथानकांवर आधारित कीर्तने, कोकणाकडचा दशावतार, कानडी भाषेतलं यक्षगान, भागवतमेळे, वर्षभरातले विविध व्रतवैकल्ये, सण, समारंभ, बारसे, विवाह, अंत्यसंस्कार असे विविध विधी यानं सगळं सांस्कृतिक वातावरण भरलेलं-भारलेलं होतं. काही धार्मिक प्रसंगी विशेषतः दसऱयाच्या दिवशी सोंग काढण्याची परंपरा अनेक ठिकाणी दिसून येते. इथे कथानक आणि संवाद हे घटक नसतात, पण व्यक्तिरेखा, वेशभूषा, थोडं संगीत, नाच हे नाटकातले घटक मात्र दिसून येतात. कथन परंपरेत पारायण–प्रवचन–कीर्तन असे विविध टप्पे दिसून येतात. पारायणात वाचन असतं, प्रवचन वाचनासोबत थोडं समजावून सांगितलं जातं, तर कीर्तनात समजावून सांगणं एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर असतं की, त्यासाठी संगीत आणि अभिनय हे घटक वापरले जातात. कीर्तनातील गेय काव्य आणि त्याचं गद्य निरूपण यात विष्णुदासांच्या नाटकाचं मूळ आढळतं.

संस्कृत नाटकांमध्ये पूर्वी धृवा नावाचा गीतप्रकार असत असे. या धृवा नट गात नसत, तर गायकवृंद त्या गात असे, नट फक्त त्याबरहुकूम हालचाली करत. कीर्तनाप्रमाणे गीत-गद्याचा क्रम आणि त्यातल्या धृवांसारख्या गाण्यांवरचा नटांचा अभिनय म्हणजेच विष्णूदास भाव्यांनी सादर केलेलं सीता, स्वयंवर होतं.

विष्णूदास भाव्यांनी सांगलीकर पटवर्धन संस्थानिकांच्या सांगण्यावरून सीता स्वयंवर आख्यान सिद्ध केलं आणि त्याचा प्रयोगही सादर केला. नेमके कथानक, सुरस काव्यरचना, त्यांच्या सुश्राव्य चाली, नटांच्या रंगीबेरंगी वेशभूषा, रंगभूषा, त्यांची चिलखते, टोप, आयुधे अशा मंचवस्तूंनी युक्त अशी विष्णुदासांची नाटय़कृती सर्वांनाच फार आवडली. म्हणून या नाटकाचे जनतेला बघता येण्यासाठी अजून काही प्रयोग व्हावेत अशी राजेसाहेबांनी इच्छा प्रदर्शित केली. म्हणून मराठी मातीतल्या या पहिल्या आख्यानाचे अनेक प्रयोगही झालेत. राजेसाहेबांनी विष्णुदासांना राजदरबारात नाटक करण्याची रीतसर पगारी नोकरीच दिली.

विष्णुदासांनी रचलेल्या नाटकात भागवत मेळय़ाच्या पूर्वरंगातील काही घटक आणि दशावताराच्या पूर्वरंगातील काही घटक यांचे मिश्रण आढळते. ज्यात मंगलाचरण, देवतांचे–विशेषतः गणपती आणि सरस्वतीचे स्तवन, त्यांचा आशीर्वाद मागणे, देवतांनी तो देणे, एखादे विनोदी पात्र आणि सूत्रधार यांच्या संवादातून आख्यानाची पूर्वकल्पना आणि शेवटी बालगोपाळ गंधर्वांचे सनृत्य गायन इत्यादी बाबींचा समावेश होता.  आख्यानात सूत्रधार निवेदन करायचा, गाणी म्हणायचा. त्याबरहुकूम पात्रे मंचावर येत जात असत आणि अभिनय करत असत. पात्रांनी स्वतः गाणं न म्हणता, गायल्या गेलेल्या शब्दावर फक्त अभिनय करायचा. ही परंपरा दक्षिण हिंदुस्थानातल्या बहुतेक सर्व पारंपरिक प्रयोगकलांमध्ये आढळते. विष्णुदासी आख्यानातील सूत्रधार निवेदन आणि गायन करत असे. मराठी समाजमनाला नृत्यापेक्षा संगीत ही कला अधिक जवळची वाटते. भाव्यांनीदेखील कर्नाटकी नाटकाचे मराठीकरण करताना हाच विचार केला. मूळ भागवत मेळय़ाच्या तुलनेत आपल्या नाटकातले नृत्याचे प्रमाण कमी केले आणि संगीताचे वाढवले. गाण्यांसाठी क्वचित ठिकाणी अभिजात रागांचा वापर केला. कीर्तनी परंपरेतल्या प्रासादिक चाली, स्त्र्ााr गीतांच्या सुगम चाली यांचा उपयोग गाण्यांच्या चालींसाठी केला.

अशा प्रकारे दशावतार, यक्षगान, भागवत मेळे, कीर्तन, स्त्र्ााr गीते, रागसंगीत यांच्यातले काही घटक आणि स्वतःकडची कलाकुसर या सर्वांच्या मिश्रणातून त्यांनी विष्णुदासी नाटक हा नाटय़ सादरीकरणाचा नवा बाज तयार केला. हे नवीन पठडीचे नाटक प्रेक्षकांनाही खूप भावत होते.

राजेसाहेबांच्या आज्ञेवरून त्यानंतर विष्णुदास भाव्यांनी रामायण, महाभारतातील अनेक कथानकांवर आख्याने रचली. सादरदेखील केली.

विष्णुदास भाव्यांनी 1843 मध्ये सादर केलेले सीता स्वयंवर हे नाटक लिखित स्वरूपात नव्हते, त्यांनी लिहिलेली पदेच फक्त आज उपलब्ध आहेत. त्यावरून त्यावेळी या नाटकाचा प्रयोग नेमका कशा पद्धतीने सादर होत असेल, याची कल्पना करता येणे अवघड आहे. 1999 मध्ये पुणे विद्यापीठाच्या ललित कला पेंद्राने हा प्रयोग करून पाहिला आणि त्याची रंगावृत्ती तयार करण्यात आली. अशा या अनोख्या, परंतु संहिता उपलब्ध नसलेल्या नाटकाची संहिता ‘पुनर्रचित सीता स्वयंवर’ या पुस्तकाच्या रूपाने मराठी रंगभूमी दिनी म्हणजे दि. 5 नोव्हेंबर 2022 रोजी कोल्हापूरच्या ‘रावा प्रकाशना’कडून ललित कला पेंद्राच्या ‘ललित पौर्णिमा’ महोत्सवात 1999 च्या प्रयोगात काम केलेल्या कलावंताच्या हस्ते प्रकाशित झाले. दरवर्षी त्रिपुरारी पौर्णिमेच्या आसपास ललित कला पेंद्राचे विद्यार्थी या महोत्सवात रात्रभर गायन, वादन, नर्तन आणि नाटकांचे प्रयोग सादर करतात. 1999 मध्ये सीता स्वयंवरचे संगीत दिग्दर्शन केलेले दत्तप्रसाद रानडे आणि सहकाऱयांनी ही पदे सादर केली.‘पुनर्रचित सीता स्वयंवर’ या पुस्तकाचे प्रकाशन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील, ललित कला पेंद्र परिसरातील ‘अंगणमंच’ येथे झाले.

‘पुनर्रचित सीता स्वयंवर’ या पुस्तकात ‘सीता स्वयंवर’ या नाटकाच्या रंगावृत्तीखेरीज मी लिहीलेल्या दीर्घ प्रस्तावनेचा समावेश आहे. त्यात 1842 मध्ये सादर झालेल्या विष्णुदास भाव्यांच्या नाटकाच्या प्रेरणा, त्यामागील इतिहास तसेच त्या नाटकाचे मराठी रंगभूमीवरील महत्त्व आणि 1999 मध्ये सीता स्वयंवरची संहिता नव्याने रचताना मनाशी बाळगलेली उद्दिष्टय़े, संशोधनाची कार्यपद्धती तसेच प्रयोग उभारणीपर्यंतच्या प्रवासाचे वर्णन आहे. नव्या रंगावृत्तीत काय काय बदल झालेले आहेत हे तपासून पाहता यावे म्हणून भाव्यांनी रचलेले मूळ सीता स्वयंवराख्यानाचाही समावेश या पुस्तकात आहे.  याशिवाय 1999 चा प्रयोग पाहून तारा भवाळकर आणि विजय तापस यांनी प्रयोगाची समीक्षा करणारे लेख, विष्णुदासांनी लिहिलेल्या समग्र आख्यान नाटकांची यादी, त्यांच्या नाटकांमध्ये काम करणारे कलावंत, त्यांच्यातील करार, पत्रव्यवहार तसेच विष्णुदासांनी मुंबईत प्रयोग केल्यानंतर त्याचे इंग्रजी वृत्तपत्रांत आलेले परीक्षण व जाहिराती अशा अनेक गोष्टी या पुस्तकात समाविष्ट केलेल्या आहेत. नाटय़ कलाकृती आणि नाटय़ इतिहासातील महत्त्वाचा दस्तावेज अशा दोन्ही पातळय़ांवर हे पुस्तक महत्त्वाचे आहे.

(लेखक सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठातील ललित कला पेंद्राचे विभाग प्रमुख आहेत.)

[email protected]