
ठाण्यात बनावट नोटांच्या धंद्याचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. कासारवडवली येथे ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या वागळे इस्टेट युनिट-5 च्या पथकाने या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून सुमारे आठ कोटी रुपयांचे बनावट चलन जप्त केले आहे.
ठाणे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे राम शर्मा (वय – 52) आणि राजेंद्र राऊत (वय – 55) अशी आहेत. पोलिसांनी आरोपींकडून 2000 च्या नोटांचे 400 बंडल जप्त केले आहेत. सदर आरोपी पालघरचे रहिवासी असून ते या नोटा बाजारात चलनासाठी घेऊन जाण्याच्या तयारीत होते. मात्र तत्पूर्वीच त्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
मिरारोड जवळ एका इनोव्हा कारमध्ये (एमएच-04, डीबी 5411) बनावट नोटा आणल्या जात असल्याची माहिती खबऱ्यामार्फत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांना मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी माऊली स्नॅक्स कॉर्नर, गायमुख चौपाटी घोडबंदर इथे सापळा रचला. यावेळी पोलिसांनी मोठ्या शिताफीने राम शर्मा आणि राजेंद्र राऊत या दोघांना इनोव्हा गाडीसह ताब्यात घेतले. कारमध्ये पाठीमागच्या सिटखाली 4 खाकी पुढ्याचे खोके ठेवलेले होते. यात 2 हजार रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्या.
View this post on Instagram
सदर नोटा मदन चौव्हाण याच्या मदतीने पालघर येथील गोडावूनमध्ये छापण्यात आल्या होत्या. संगणक आणि प्रिंटरच्या सहाय्याने या नोटा छापण्यात आल्या व या नोटांच्या विक्रीसाठी येथे आलो होतो अशी माहिती आरोपींनी पोलीस चौकशीमध्ये दिली. आरोपींनी गुन्हा कबूल केल्यानंतर त्यांच्याविरोधात सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश महाजन यांच्या फिर्यादीरून कलम 489(अ), 489(ब), 489(क), 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अरुण क्षिरसागर हे करत आहेत.























































