परदेशी महिलेचे साहित्य चोरणारी अटकेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

परदेशी महिलेचे साहित्य चोरून पळ काढणाऱया महिलेला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे पोलिसांनी अटक केली. राधा सेठी असे तिचे नाव असून तिच्याकडून चोरीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. सेठी ही सराईत गुन्हेगार असून तिच्या विरोधात दादर रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

रॅचेल ओमेसबी या न्यूझीलंड येथे राहतात. त्या बुधवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आल्या. गाडीला वेळ असल्याने त्यांनी जनरल हॉलमधील लॉकरमध्ये साहित्य ठेवले. गाडीची वेळ झाल्यावर त्या लॉकरमधून साहित्य काढण्यासाठी गेल्या तेव्हा मोबाईल, मॅकबुक, सोन्याचे दागिने असलेली बॅग चोरीला गेली. बॅग चोरीप्रकरणी रॅचेलने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पोलीस ठाण्यात धाव घेतली.

वरिष्ठ निरीक्षक मेहबूब इनामदार यांच्या पथकातील उपनिरीक्षक सांगळे आणि सहकाऱयांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी तेथील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली तेव्हा एक महिला ही बॅग घेऊन जात असल्याचे दिसले. तिने हार्बर मार्गावरून वांद्रय़ाला जाणारी लोकल पकडल्याचे फुटेजवरून उघड झाले. त्यानंतर पोलिसांचे पथक वडाळा आणि वांद्रे येथे गेले.

ती महिला वांद्रे टर्मिनसला गेल्याचे समजताच पोलीस तेथे गेले. पोलिसांनी वांद्रे टर्मिनस येथील फुटेजची तपासणी केली तेव्हा राधा ही अजमेर एक्स्प्रेसने जात असल्याचे समोर आले. ती एक्स्प्रेस बोरिवली येथे थांबवणार असल्याने याची माहिती बोरिवली रेल्वे पोलिसांना कळवली. काहीच वेळात बोरिवली पोलिसांनी राधाला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक बॅग हस्तगत केली. राधा ही मूळची राजस्थानची रहिवासी असून ती एक्स्प्रेसमध्ये चोऱया करते.