
>> राहुल गोखले
एखाद्या पक्ष्याचे त्याच्या जन्मापासूनचे जीवनचक्र अनुभवणे तसे अद्भुत. याचे कारण पक्ष्याच्या साऱया वैशिष्टय़ांचे दर्शन त्यातून घडत असते. तथापि त्यासाठी निरीक्षणशक्ती आणि पुरेसा वेळ द्यायची तयारी असावी लागते; चिकाटी आणि संयम लागतो. प्र. सु. हिरुरकर हे दीर्घकाळ पक्षी निरीक्षणाचा छंद जोपासत आहेत. मात्र त्याला अभ्यासाची जोड त्यांनी दिली आहे. त्यामुळेच त्यांनी लिहिलेली पुस्तके रंजक असतात. ‘टिटवी’ हे पुस्तक याची प्रचीती देते.
आपल्या घरापासच्या मोकळ्या जागेत नर-मादी टिटवीच्या सहजीवनापासूनच्या मादी टिटवीच्या मातृत्वाच्या आणि पिल्ले जन्माला आल्यानंतर त्यांनी स्वयंपूर्ण होईपर्यंतच्या प्रवासाचे बारीक निरीक्षण लेखकाने केले. त्यातून पक्षीजीवनाचे आणि त्यातही टिटवीच्या अनेक वैशिष्टय़ांचे दर्शन लेखकाला घडले. तेच या पुस्तकात अतिशय रोचक पद्धतीने मांडण्यात आले आहे. हे पुस्तक म्हणजे टिटवीच्या कुटुंबावर सतत तीन वर्षे केलेले निरीक्षण आणि अभ्यास आहे असे लेखकाने नमूद केले आहे.
शिशिराची चाहूल लागली तेव्हा लेखकाला आपल्या घरापाशी टिटवीची जोडी आढळली. त्याने त्यांचे नामकरण सागर आणि सरिता असे केले. शिशिर ऋतू म्हणजे टिटवी पक्ष्यांच्या विणीचा हंगाम. या पक्ष्यांच्या शारीरिक वैशिष्टय़ांचा उल्लेख लेखकाने केला आहे. मात्र त्याहून रंजक भाग आहे तो या जोडीने पिल्लांना जन्म देण्याचा प्रवास. हा सगळा प्रवास लेखकाने एखाद्या चलचित्रपटाप्रमाणे शब्दांतून मांडला आहे. यातील काही निरीक्षणे वाचकाला अतिशय विस्मयकारक वाटतील. निसर्गाला जीवनाचे चक्र चालू राहावे यात स्वारस्य असल्याने अशी उपजत समज प्राण्यांना-पक्ष्यांना निसर्गाने दिली असावी. अनेक पक्षी आपल्या पिल्लांना चोचीने भरवतात; पण टिटवी आपल्या पिल्लांना भरवत नाही. जन्माला आली की, पिल्ले स्वतःच खाद्याचा शोध सुरू करतात इत्यादी अनेक लक्षवेधी निरीक्षणे लेखकाने नोंदविली आहेत.
एका टिटवीच्या जोडीचे हे सहजीवन, त्यात काहीदा अन्य नराने किंवा मादीने लुडबुड करण्याचा प्रकार, त्यांना तशी करू न देण्याचा या जोडीचा निर्धार इत्यादी भागदेखील वाचनीय. मारुती चित्तमपल्ली यांच्यापासून व्यंकटेश माडगूळकर यांच्यापर्यंत अनेक अभ्यासू लेखकांच्या पुस्तकांतील समर्पक उद्धरणे देऊन लेखकाने पुस्तकाची खुमारी वाढविली आहे. पुस्तकातील छायाचित्रे मजकुराला पूरक . मादीने अंडी घालण्यापासून त्यातून जन्माला आलेल्या पिल्लांनी आकाशात झेप घेईपर्यंतचा हा प्रवास रंजक आहे. वाचकांना निसर्गाच्या या आगळ्या किमयेचे दर्शन प्रत्ययकारी पद्धतीने घडवेल यात शंका नाही. एका अर्थाने हे टिटवीचे ‘जीवन’गाणे आहे, असेच या पुस्तकाचे वर्णन केले पाहिजे.
टिटवी
लेखक : प्र. सु. हिरुरकर
प्रकाशक : ई साहित्य प्रतिष्ठान
पृष्ठे : 83






























































