लोकशाही पायदळी तुडवून सत्ता हवी असणाऱ्यांना आधी खाली खेचा, उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रबोधनकार डॉटकॉम या संकेतस्थळाचे नवीन स्वरुपाचं लोकार्पण मुंबई येथील शिवाजी मंदिर नाट्यगृहात पार पडलं. या सोहळ्याचं उद्घाटन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते पार पडलं. या कार्यक्रमावेळी उद्धव ठाकरे यांनी तडाखेबंद भाषण करत केंद्र आणि राज्यातील सत्ताधाऱ्यांचा खरपूस शब्दांत समाचार घेतला आहे. यावेळी लोकशाहीचे चारही स्तंभ डळमळीत करून हुकूमशाहीच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे संकेतही त्यांनी दिले. तसेच लोकशाही पायदळी तुडवून सत्ता हवी असणाऱ्यांना आधी खाली खेचा, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.

देशात लोकशाही यावी म्हणून त्याग करणाऱ्या महापुरुषांचा उल्लेख करत ते म्हणाले की, मिळालेली लोकशाही वाचवण्यासाठी जे प्रयत्न करतील त्यांना सोबत घेऊन काम करू असंही ते यावेळी म्हणाले.

उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे –

आजपर्यंत शिवसेनेच्या प्रत्येक कार्यक्रमात छ. शिवाजी महाराज आणि बाबासाहेबांच्या प्रतिमेला वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. पण आज मला असं वाटतं की त्याला कौटुंबिक रूप आलं आहे. दोन नातू एकत्र आणण्याचं काम पणतू सचिन यांनी केलं आहे. काही वर्षांपूर्वी असाच एक कार्यक्रम कलिनामध्ये झाला होता. तेव्हा रामदास आठवले सोबत होते. तेव्हा ते मला म्हणाले होते की, तुम्ही प्रबोधनकारांचे नातू आणि आम्ही वैचारिक नातू. म्हटलं असं असेल तर नातू ना मी असं कशाला आपण एकत्र येऊ.

आज मला आनंद, अभिमान वाटतोय. असं नाही की माझी आणि प्रकाशजींची ओळख नाही. आम्ही भेटतो. पण त्यांना भेटण्यासाठी वेळ काढावा लागतो कारण माहिती आणि ज्ञान यांचा धबधबा काही मिनिटांचा नसतो. आज पहिल्या प्रथम आम्ही एकाच व्यासपीठावर आलो असलो तरी वैचारिक व्यासपीठ एकच आहे. त्यामुळे एका व्यासपीठावर यायला आम्हाला अडचण आली नाही. आणि येणारही नाही. दोन्ही विचारांचे वारसे सोबत घेऊन चाललो आहोत. मी प्रबोधनकारांचा नातू आहे म्हणून त्यांना रोज भेटता भेटता त्यांना वाचलं. याचं कारण ते जुने दिवस. जुनं मातीचं घर होतं. आज इंटरनेटमुळे जग छोटं झालं आहे. त्यावेळी ते प्रत्यक्षातही छोटं होतं. रात्रीच्या वेळी जेवणं झालं की मातोश्रीच्या छोट्या हॉलमध्ये आजोबा बसायचे. समोर आम्ही नातवंडं लोळत असायचो. त्यावेळी आजोबा त्यांच्या आयुष्यातील अनुभव आम्हाला सांगायचे
ते ऐकता ऐकता विचारांच्या मुशीतून आम्ही उभे राहिलो. नंतर शिवसेना आणि शिवसेनाप्रमुखांचा पुढचा कालखंड तुम्ही पाहिलेलाच आहे.

पाहा उद्धव ठाकरे यांचं तडाखेबंद भाषण –

आता प्रकाशजींनी सांगितलं ते धर्मातल्या धर्मातलं भांडण हे माणसाला माणूस म्हणून जगू न देण्यामुळे झालं होतं. माणुसकी हा सर्वात मोठा धर्म आहे. आणि मग सांगायचंच झालं तर मनुस्मृती आणि चातुर्वर्ण्याचा उल्लेख आला. तो उल्लेख जेव्हा बाळासाहेबांच्या समोर आला तेव्हा ते म्हणाले की, चातुर्वर्ण्यात डोकं म्हणजे ब्राह्मण आणि पाय म्हणजे शूद्र असेल तर जेव्हा आरोग्यासाठी डॉक्टर शीर्षासन करायला सांगतात तेव्हा शीर खाली असतं आणि पाय वर असतात. जेव्हा आपण चांगल्या कार्याला जातो तेव्हा वडिलधाऱ्यांच्या पायाला हात लावतो की डोक्याला? आता ही शिकवण आमच्या रक्तात भिनलेली आहे आणि ते आमचं हिंदुत्व आहे.

हिंदुत्व म्हणजे नेमकं काय. आपला देश कसा विचित्र चाललेला आहे. तेव्हा या दोघांचं महत्त्व काय आहे? की त्यांनी उभ्या राहू न शकणाऱ्या समाजाला उभं केलं. नुसतं उभं करून दिशा दाखवली नाही, तर त्याच्यासोबत चालले आणि चालत चालत त्यांना वाट दाखवली. अर्थात आदर्श कोणाला मानायचं हा लोकशाहीचा भाग आहे. वाट दाखवणारे आदर्श मानायचे की वाट लावणारे आदर्श मानायचे हा मोठा प्रश्न आहे. आज ज्या दिशेने आपण नक्कीच हुकूमशाहीच्या दिशेने चाललो आहोत, याबद्दल कोणाच्याही मनात तीळमात्र शंका असायचं कारण नाही. आणि बुरखा घातलेला स्वतःचा चेहरा दाखवला तर लोकं जवळ येणार नाहीत. तर लोकांना जवळ करण्यासाठी मुखवटा घालायचा, मत मिळवायची आणि राज्य करायचं. इंग्रजांची जी निती होती की फोडा आणि राज्य करा, हीच आता चालली आहे. जातीपाती धर्माच्या भिंती उभ्या करायच्या आणि राज्य करायचं.

शिवसेनेतही अनेक जण शाखाप्रमुखांपासून मंत्री झाले पण शिवसेनाप्रमुखांनी त्यांना कधीही जाती विचारल्या नाहीत. हल्ली गोमांस सापडलं म्हणून माणसांना मारलं जातं. पण दुसरीकडे एका महिलेवर अत्याचार करणाऱ्या, तिच्या डोळ्यादेखत तिच्या मुलीची हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांची शिक्षा माफ करून त्यांना सोडलं जातं, त्यांचा सत्कार होतो आणि त्यांना उमेदवारी दिली जाते. हे आमचं हिंदुत्व नाही. कुणी त्यांच्या आयुष्यात काय काय केलं, हो त्यांनी त्यावेळी त्यांच्या आयुष्यात काम केलं. तू काय करतोयस ते सांग.. देशासाठी बाबासाहेब आणि प्रबोधनकार यांनी समाजाला उभं केलं आहे. त्यांनी ते काम केलं नसतं तर या समाजाला मान मिळाला नसता.

आज आपलं स्वातंत्र्य धोक्यात आलं आहे. ते स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी जे जे सोबत येतील त्यांच्यासोबत आम्ही जाणार. कारण, बाहेर गुलामगिरी आहेच, हुकूमशाही आली आहे. घटनेतही राज्य आणि केंद्राचा स्पष्ट उल्लेख आहे. राज्याचा उल्लेख हा केंद्राचा गुलाम नाही. राज्याला देखील काही अपवाद वगळून केंद्राएवढेच अधिकार आहेत. अन्यथा राज्य आणि केंद्र समान असूनही आज तसं दिसत नाही. लोकशाही तुडवून, घटनेची कलमं पायदळी तुडवून सत्ता पाहिजे असं म्हणणाारी माणसं देशाला लायक नाहीत. त्यांना आधी खाली खेचायला पाहिजे, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.