नाद-मराठी – रसिका तुझ्याच साठी…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अरुण जोशी

बेगम परवीन सुलताना हे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातलं एक मातब्बर व्यक्तिमत्त्व. विलक्षण गोड आणि पल्लेदार स्वर असलेल्या बेगम परवीन अतिशय प्रसन्न मुद्रेने आपली कला सादर करतात. त्यांचं गाणं म्हणजे त्यांच्या प्रेक्षक-श्रोत्यांशी सुरू असलेला स्वरमंडित संवादच असतो. त्या मंचावर आल्या की त्यांच्या ज्ञानसंपन्न व्यक्तिमत्त्वाने श्रोते भारावून जातात. अत्यंत विनम्रतेने रसिकांना नमस्कार करून त्या एकवार सभागृहावर नजर फिरवतात आणि क्षणात त्यांच्या लक्षात येतं की, आज श्रोतृवृंदाला काय आवडेल. मग तशीच मैफल त्या रंगवतात. एका मुलाखतीत त्यांनी ते स्पष्ट केलं होतं, ‘कलाकाराला रसिकांचं मन जाणून घेता आलं पाहिजे. पुढे कोचावर बसलेल्यांपासून ते मागच्या बाजूला बाल्कनीत बसणार्‍या सर्व प्रेक्षक-श्रोत्यांना एकाच वेळी खूश करणारं सादरीकरण करता आलं पाहिजे. कारण कोणताही श्रोता काही अपेक्षेने, पैसे खर्चून आलेला असतो. आम्ही ‘परफॉर्मिंग आर्टिस्ट’ असल्याने श्रोत्यांचं समाधान होईल असे सुयोग्य आणि शुद्ध स्वर लागले पाहिजेत. गाणं लोकांना आवडलं पाहिजे.

त्यांची ही भूमिका गंगाधर महाम्बरे यांच्या त्यांनीच गायलेल्या अप्रतिम मराठी गीतातील शब्दांसारखी आहे. या एकाच गाण्याने मराठी रसिकांची मने जिंकण्याची किमया त्यांनी केली आहे. एरवी खयाल-ठुमरी आणि रागदारीचं शास्त्रीय संगीत गाणं हाच त्यांचा श्वास आहे. परंतु हे गीत त्यांचंच मनोगत वाटतं. कारण बेगम परवीन सुलताना म्हणतात की, ‘मी देश-विदेशात कार्यक्रम करते तेव्हा श्रोत्यांचा उदंड प्रतिसाद मिळतो. शास्त्रीय संगीत लोकांना फारसं रुचत नाही हे खरं नव्हे. सादर करणार्‍यानेही त्या ताकदीने रसिकांपुढे ते सादर केले पाहिजे. त्यासाठी गुरूकडे शिकून भरपूर रियाज केला पाहिजे. आपल्याकडे परंपरेने आलेला हा वारसा जतन केला पाहिजे. तोकड्या मार्गाने तेजस्वीता कशी लाभेल? (देअर आर नो शॉर्टकट्स टू ग्लोरी.) त्यांचं म्हणणं शंभर टक्के खरे आहे आणि त्यासाठी त्यांनी स्वत: बालपणापासून प्रयत्न केले आहेत.

आसामसारख्या दूरच्या र्ईशान्येकडील राज्यातील पुरानीगड-नागाव येथे जन्मलेल्या परवीन यांचा गळा गोड असल्याचं घरच्या मंडळींनी जाणलं. चिन्मौय लाहिरी या गुरुजींकडे परवीन शास्त्रीय संगीताचे धडे घेऊ लागल्या. त्या तयारीमुळे अब्दुल माजीद यांच्या ‘मोरोम तृष्णा’ या चित्रपटासाठी गाण्याची संधी त्यांना बालवयातच मिळाली. त्यानंतर त्यांचे पती आणि गुरू उस्ताद दिलशाद खान यांच्याकडे त्यांनी पतियाळा घराण्याच्या गायिकीचे शिक्षण घेतले. किराणा घराण्याची खासियतही कंठस्थ केली. बेगम परवीन सुलताना यांच्या मैफली होऊ लागल्या. त्यातून त्यांनी अनेक प्रकारची बहारदार रागदारी सादर केली. मुंबईत संगीतसम्राट अल्लादिया खां यांच्या स्मृतिसमारोहात परवीन सुलताना यांचे प्रसन्न गायन ऐकण्याचा योग आला. त्या दोन-अडीच तासांत श्रोते पूर्णतया भारावून गेले होते.

शास्त्रीय संगीताची साधना परवीनजींनी मोठ्या आत्मीयतेने केली आहे. तशी ऊर्मी नव्या पिढीतही असल्याचं त्यांना जाणवतं. मात्र तरुण गायक-गायिकांना शास्त्रीय संगीत शिकण्यासाठी प्रोत्साहन द्यायला हवं असं त्यांचं मत आहे. सिनेसंगीतामधले लता, आशा, रफी, किशोर असं मोजके स्वर वगळता अनेक आवाज आले आणि गेले. या दिग्गजांची शास्त्रीय संगीताची बैठक (किशोर कुमार हा अपवाद) पक्की होती. कोणत्याही कलाकाराने खूप परिश्रम करून संगीत-साधना करून आपलं स्थान पक्कं केलं पाहिजे, असं बेगम परवीन सुलताना यांचे म्हणणं आहे. बरंचसं सिनेसंगीत चार दिवस लोकप्रिय होतं, पण नंतर विस्मरणात जातं. शास्त्रीय संगीत हजारो वर्षे टिकून आहे. अशा आशयाचे त्यांचे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताबाबतचे विचार आहेत. नव्या पिढीकडून आशा-अपेक्षा आहेत.

बॉलीवूडसाठी त्यांनी ग़जल-ठुमरी गायिली आहे. मीनाकुमारीच्या ‘पाकिजा’ या गाजलेल्या चित्रपटातील ‘आज कौन गली गयो शाम’ ही ठुमरी परवीन सुलताना यांचीच. गदर, दो बूंद पानी, कुदरत अशा काही चित्रपटांसाठी त्यांनी स्वर दिला. १९८१ मध्ये ‘कुदरत’मधल्या ‘हमे तुमसे प्यार कितना’ या गाण्याला ‘फिल्फ फेअर अ‍ॅवॉर्ड’ मिळालं. अरुणा इराणीवर चित्रित झालेलं हे गीत जरूर ऐका.

या मधुर स्वराला अनेक सन्मान लाभले. गंधर्व कलानिधी, मियां तानसेन अ‍ॅवॉर्ड, आसाम सरकारचा ‘संगीत सम्राज्ञी’ तसेच ‘पद्मभूषण’ सन्मानही परवीनजींना प्राप्त झाला. त्यासाठी त्यांची संगीत साधना आणि मराठीत गायिलेल्या (बहुधा एकाच) गीतात शब्दश: व्यक्त झाली आहे. महाम्बरेंच्या या गीताचं संगीत राम फाटक यांचं आहे.
आले दुरून येथे, घेऊन सूर कंठी
जणू विठ्ठला घरी ये दिंडीच वाळवंटी’

खरोखरच आसामसारख्या दूरस्थ प्रांतातून येऊन त्यांनी जगभर आपले गानरसिक निर्माण केले. महाम्बरे म्हणतात तसं, ‘रसिका तुझ्याच साठी, मी एक गीत गाते, हृदयात दाटलेली भावांजली वाहते’ अशीच बेगम परवीन सुलताना यांची भावना असते. त्यामुळे असं एखादंच गीतसुद्धा रसिकांना अवघी ‘मैफल’ देऊन जातं.