
शिवडी पादचारी पूल पहिल्या टप्प्यात शिवडी रेल्वे स्थानक पुलाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकला जोडण्यात येणार आहे तर दुसऱया टप्प्यात हा पूल पूर्वेपर्यंत वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे पश्चिम आणि पूर्वेत राहणाऱया शिवडीकरांना रस्ता न ओलांडता सहजपणे ये-जा करता येणार आहे. हा पूल व्हावा आणि शिवडीकरांची फरफट थांबावी यासाठी शिवसेनेने पाठपुरावा केला होता.
शिवसेनेकडून शिवडीतील नागरी समस्या सोडवण्यावर आणि विकासकामांवर भर दिला जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शिवडीकरांना तसेच प्रवाशांना शिवडी आगारात उतरल्यानंतर शिवडी रेल्वे स्थानकात जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष राजीव जलोटा यांच्या दालनात शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीत या दोन्ही कामांना मुंबई पोर्ट ट्रस्टचे ना हरकत प्रमाणपत्र लवकरच मिळावे अशी मागणी करण्यात आली. यावर बॉम्बे पोर्ट ट्रस्ट सकारात्मक असल्याचे जलोटा यांनी सांगितले. बैठकीला शिवसेना माजी नगरसेवक सचिन पडवळ, शाखाप्रमुख हनुमंत हिंदोळे, मुंबई महापालिका पूल विभागाचे सहाय्यक अभियंता कुणाल वैद्य, कनिष्ठ अभियंता स्वाती पाटील उपस्थित होते.
























































