
देशातील भाजपा सरकार भ्रष्टाचारमुक्त असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या नेत्यांकडून सातत्याने केला जात आहे. हा दावा खोडून काढत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ‘एक दिवस सीबीआय आणि ईडी माझ्याकडे सोपवा, अर्धा भाजप तुरुंगात जाईल’, असे सांगत पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केजरीवाल यांनी केंद्रीय तपास यंत्रणांकडून आप नेत्यांवर दाखल खटल्यांबाबत बोलताना मोदी तसेच भाजपवर जोरदार हल्ला चढवला. केजरीवाल म्हणाले, भाजपकडे सीबीआय आणि ईडी आहे. गेल्या सात वर्षात त्यांनी आप नेत्यांवर इतके आरोप केले पण ते एकही सिद्ध करू शकले नाहीत. पण, एक दिवस सीबीआय-ईडीचे नियंत्रण माझ्याकडे दिल्यास अर्धे भाजप नेते तुरुंगात जातील एवढं मात्र निश्चित.
गेल्या सात वर्षांमध्ये आप नेत्यांवर खटले दाखल केले आहेत. मात्र, एकाही खटल्यातील आरोप ते न्यायालयात सिद्ध करू शकले नाहीत. 150 हून अधिक खटल्यांमधून आप नेते दोषमुक्त झाले आहेत. तर उर्वरित खटले प्रलंबित आहेत. तपास यंत्रणेच्या 800 अधिकाऱयांकडून आप नेत्यांवर दाखल खटल्यांबाबत तपास करण्यात आला. मात्र, त्यांना काहीही सापडले नाही, असे केजरीवाल म्हणाले.


























































