राज्य सरकारच्या उदासीनतेमुळे नर्सिंग प्रवेशाला उशीर, पुन्हा नोंदणी करावी लागणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नीटच्या धर्तीवर होणाऱ्या राज्यातील बीएसस्सी नर्सिंग प्रवेशाला राज्य सरकारने वेळीच विरोध न केल्याने यंदाच्या नर्सिंग प्रवेशाला उशीर झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाच्या निर्णयानंतर नर्सिंग अभ्यासक्रमाचे प्रवेश आता नीट ऐवजी बारावीच्या परीक्षेत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, जीवशास्त्र (पीसीएमबी) तसेच इंग्लिशमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे होणार आहेत. नर्सिंग प्रवेशाच्या पहिल्या फेरीनंतर न्यायालयाचा निर्णय आला होता. त्यानुसार बारावीच्या धर्तीवर होणाऱ्या नव्या प्रवेशासाठी पुन्हा नोंदणी करावी लागणार आहे. प्रवेशाचे नेवे वेळापत्रक उद्या जाहीर होण्याची शक्यता आहे.

नर्सिंग प्रवेशाच्या पहिल्या फेरीत सुमारे 1200 प्रवेश झाले आहेत. या प्रवेशांना संरक्षण देत हायकोर्टाने हा निर्णय दिला आहे. या निर्णयाचा फायदा नीट परीक्षेत उत्तीर्ण होऊ न शकलेल्या राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना होणार आहे. प्रायव्हेट नर्सिंग स्कूल अॅण्ड कॉलेज मॅनेजमेंट असोसिएशन (पीएनएससीएमए) च्या सदस्यांनी कॉमन एंटरन्स टेस्ट (सीईटी) सेलला न्यायालयाच्या आदेशानुसार बीएससी (नर्सिंग) अभ्यासक्रमासाठी पुन्हा प्रवेश प्रक्रिया राबवण्याची मागणी केली आहे. नीटचा निकष महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी अन्यायकारक होता.

राज्यातील बीएसस्सी नर्सिंगच्या 5,164 जागांसाठी बारावीच्या गुणांआधारे नव्याने प्रवेशप्रक्रिया राबविण्यासाठी  महाराष्ट्र नर्सिंग काwन्सिल आणि खासगी नर्सिंग स्कूल अॅण्ड कॉलेज मॅनेजमेंट असोसिएशनच्या वतीने सर्व नर्सिंग कॉलेज व्यवस्थापन, प्राचार्य, प्राध्यापक आणि इच्छुक विद्यार्थ्यांसोबत नवीन प्रवेश पद्धतीवर चर्चा करण्यासाठी आज  ऑनलाइन सत्र राबिण्यात आले होते.

आतापर्यंत प्रथम सत्र परीक्षा पूर्ण व्हायची

दिवाळी सुट्टीपर्यंत नर्सिंग प्रवेशाची प्रथम सत्र परीक्षा पूर्ण होत होती, असे खासगी नर्सिंग स्कूल अँड कॉलेज मॅनेजमेंट असोसिएशनचे अध्यक्ष बाळासाहेब पवार यांनी या ऑनलाइन सत्रात सांगितले. राज्य सरकारने यापूर्वी वेळीच पाठपुरावा केला असता तर पुन्हा प्रवेश प्रक्रिया राबवण्यची वेळच आली नसती असेही ते म्हणाले. नर्सिंग शिक्षणासाठी नीट पात्रता स्कोअर बनवण्याचा सीईटी सेलचा आदेश रद्द करण्याचा न्यायालयाचा निर्णय स्वागतार्ह पाऊल आहे, असेही त्यांनी सांगितले.