जेवण महाग आहे म्हटल्याचा राग आल्याने हॉटेलमालकाचा दोघांवर तलवारीने हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वाई तालुक्यातील वीरमाडे गावच्या हद्दीत सातारा ते पुणे जाणाऱया महामार्गाच्या पश्चिम बाजूस असणाऱया हॉटेल महाराजमध्ये जेवणास गेलेल्या मामा-भाच्यावर हॉटेल मालकानेच तलवारीने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात भाचा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर सातारा येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कृष्णात भरत वीरकर (वय 25, रा. मुंबई) असे जखमीचे नाव आहे. हॉटेल मालक अशरफ अस्लम शेख (रा. वीरमाडे, ता. वाई, मूळ रा. सदर बझार, सातारा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत किशोर महादेव तोडरमल (वय 40, रा. महामुलकरवाडी, ता. जावली) यांनी फिर्याद दिली आहे.

किशोर तोडरमल व त्यांचा भाचा कृष्णात हे रात्री सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास वीरमाडे गावच्या हद्दीत हॉटेल महाराज येथे जेवण करण्यास गेले होते. जेवण झाल्यानंतर किशोर तोडरमल व भाचा कृष्णात यांनी जेवण खूप महाग आहे असे हॉटेलमालकाला म्हटल्याच्या कारणावरून त्यांच्यात वादावादी झाली. यावर हॉटेलमालक अशरफ शेख याने चिडून शिवीगाळ करीत हाताने मारहाण करून ढकलून देत हॉटेलमधील तलवार आणून ‘तुम्हाला आता जिवंत ठेवणार नाही’, असे म्हणून भाचा कृष्णात याच्या डोक्यात व डाव्या हातावर तलवारीचे वार करून गंभीर जखमी केले. घटनास्थळी वाईच्या उपविभागीय अधिकारी शीतल जानवे-खराडे व सहायक पोलीस निरीक्षक आशीष कांबळे यांनी भेट दिली असून, पोलीस उपनिरीक्षक निवास मोरे तपास करीत आहेत.