
>>दिलीप जोशी
कोणे एके काळी’ असंच आता म्हणायला हवं, कारण ‘संचिता’मधल्या बऱयाच गोष्टी नवतरुणांच्या मागच्या पिढीतल्या आहेत…तर ज्यावेळी टीव्ही म्हणजे फक्त ‘दूरदर्शन’ होतं आणि कार्यक्रमही संध्याकाळी दोन-तीन तासांच्या मर्यादेत उरकले जायचे, त्यावेळचे दिवस. परंतु त्याच काळात महाराष्ट्रात प्रत्येक क्षेत्रातली दिग्गज मंडळी त्यांच्या कार्यकर्तृत्वाने गाजत होती. लतादीदी आणि समस्त मंगेशकर तर होतेच, पण इतर गायक-गायिका, संगीतकार, सुनील गावसकरसारखे क्रिकेटवीर, विविध भावाशय व्यक्त करणारे कवी आणि लेखक यांची केवळ मांदियाळी होती. ‘नाटक’ ही मराठी माणसाची विशेष आवड, अगदी लोकनाटय़ांपासून, जलशांपासून ते सामाजिक, ऐतिहासिक, पौराणिक नाटकांचे प्रयोग राज्यभर धूमधडाक्याने व्हायचे. माणसं फार पैसेवाली होती अशातला भाग नाही, पण चांगलं पुस्तक, मासिक घरात यावं अन् अधूनमधून एखादं नाटक पिंवा चित्रपट बघावा, संगीत समारोहात हजेरी लावावी हा जीवनाचा एक भाग होता.
‘फार्स’ पिंवा मराठीत ज्याला ‘प्रहसन’ म्हटलं गेलं तो नाटय़ाविष्कार मराठीत मुख्यत्वे एक विलक्षण कलाकार असलेले बबन प्रभू आणि आत्माराम भेंडे यांनी रुजवला. बबन प्रभू काही देखणे हिरे नव्हते. त्यांचा आवाज आणि हसणंही वेगळंच, पण गंमत आणणारं. बेताची शरीरयष्टी लाभलेल्या प्रभूंचा चेहरा मात्र कमालीचा बोलका होता. स्वतःवर विनोद करत करत ते प्रेक्षकांमध्ये हशा पिकवत. ते त्यांच्या ‘खास’ आवाजाबद्दल म्हणत. ‘या जगात दोनच वैशिष्टय़पूर्ण आवाज आहेत. पहिला लता मंगेशकरचा आणि दुसरा माझा!’ यावर प्रेक्षकांना हसू आवरत नसे. प्रभूंनी लिहिलेल्या ‘झोपी गेलेला जागा झाला’ आणि ‘दिनूच्या सासूबाई राधाबाई’ या फार्सचा असा काही धूमाकूळ प्रभू आणि भेंडे दाम्पत्यासह विनायक पै स्टेजवर घालायचे की प्रेक्षक तल्लीन व्हायचे.
अशा या बबन प्रभू यांना भेटण्याचा योग अनेकदा म्हणजे दर आठवडय़ाला येत असे. 1975 च्या सुमारास वसंत सोपारकरांनी बबन प्रभूंचं ‘मला उत्तर हवंय’ हे सदर सुरू केलं. बबनकडे जाऊन वाचकांचे प्रश्न दाखवून चर्चेनंतर त्यातले मोजके निवडून त्यांची उत्तरे लिहून घेण्याचं काम माझ्याकडे असायचं. ते दोन तास नुसती हास्याची आतषबाजी चालायची. ऐकणारा मी एकटाच. थोडय़ा थोडय़ा वेळाने नीलमताई चहा आणून द्यायच्या. (त्यांच्याविषयी सविस्तर पुढच्या लेखात) वाचकांच्या प्रश्नांना प्रभूंची उत्तरं कशा प्रकारची असायची. याचा एक नमुना ‘दूरदर्शन’वरच्या याकूब सईद आणि बबन प्रभू यांच्या ‘हास-परिहास’ या चुटकेवजा (दहा मिनिटांच्या) कार्यक्रमातून प्रेक्षकांना परिचित होता.
एकदा याकूब बबनला बाजारातून दोन केळी आणायला सांगतो. बबन एक केळं त्याच्या पुढय़ात ठेवतो. याकूब शांतपणे विचारतो. ‘दुसरा केला किधर है!’ बबन उत्तरतो, ‘ये क्या सामने ही तो रख्खा है.’ मग ‘तू बाजारात गेलास?’ ‘दोन केळी घेतलीस?’ वगैरे प्रश्नांना बबनचं निरागस ‘हां’ असं उत्तर आल्यावर याकूब पुन्हा चिडून विचारतो, ‘फिर दुसरा केला कहां है?’ ‘यही तो है! ये दुसराही है! पहला मैंने खाया।’ आता धो-धो पीजेच्या जमान्यात यात फार काही वाटणार नाही, पण त्या दोघांचं सादरीकरण फार मिश्कील असायचं.
बबन प्रभू इलेक्ट्रिकल इंजिनीअर होते. एकदा मी त्यांचा आणि नीलमताईंचा एक कार्यक्रम आमच्या राजावाडीतल्या गणेशोत्सवासाठी आयोजित केला. मानधन न घेता दोघेही मी त्यांचा मित्र असल्यासारखे आले. एका प्रेक्षकाने बबनला प्रश्न विचारला- ‘तुमच्या इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगच्या ज्ञानाचा कधी रंगमंचावर उपयोग झाला का?’ बबन प्रभू यांनी त्या माणसाकडे पाहताना असा काही चेहरा केला की सारं सभागृह हसू लागलं. मग उत्तर आलं.
‘एकदा मला शिवाजी मंदिरच्या बॅक-स्टेजला कुणीतरी फ्यूज दुरुस्त करायला सांगितलं. मी काहीतरी खुडबूड केली आणि पार्ला-अंधेरीचे लाईट गेले, असं नंतर कळलं! त्यानंतर कोणी माझ्या ‘ज्ञानाची’ परीक्षा घेतली नाही.’
बबन आमच्याकडे मिश्कील उत्तरांचं सदर लिहीत असताना ‘आणीबाणी’ जाहीर होऊन वृत्तपत्रांवर सेन्सॉरशिप आली. मला मंत्रालयात ‘श्रीं’ची प्रूफं त्यांना दाखवायला जावं लागायचं. त्यावेळी बबन प्रभूंच्या एका उत्तरात ‘अहमदाबादी बोरं’ असा वाप्रचार आला. त्याबरोबर तिथल्या ‘बाबू’ लोकांमध्ये खलबतं सुरू झाली, ‘अहो, अहमदाबादला विरोधी पक्षाचं सरकार आहे ना? त्याबद्दल तर ही टिप्पणी नसेल?’ झालं! तो प्रश्न वगळावा लागला! सत्ताधाऱयांना काय, राजकारण्यांना काय पिंवा एकूणच समाजधुरीणांना विनोदाचं वावडं जेव्हा निर्माण होते, त्यावेळी तो समाज मुक्त श्वास घेऊ शकत नाही. व्यंगचित्रांबद्दल असा अनुभव आधी बाळासाहेब ठाकरे आणि नंतर आर.के. लक्ष्मण यांनाही आलाच होता. अर्थात त्या काळात हे अपवादाने घडलं. एरवी आधी स्वतःवर आणि सभोवतीच्या विसंगतीवर मार्मिक शब्द-रेषांचं भाष्य करणारी खूप कलावंत मंडळी होती. अर्थातच भाषेचा दर्जा सांभाळून हे व्हायचं. बबन प्रभू त्यातले आघाडीचे विनोदी अभिनेते!





























































